Corona Vaccination: जिल्ह्यात फक्त तीन हजार काेराेना लस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 01:20 AM2021-04-09T01:20:43+5:302021-04-09T01:21:02+5:30

बहुतांश लसीकरण केंद्रे शुक्रवारी सायंकाळपर्यंत बंद हाेण्याची चिन्हे; काही ठिकाणी नागरिक रिकाम्या हाती परतले

Corona Vaccination: Only 3,000 Corona vaccines remain in the district | Corona Vaccination: जिल्ह्यात फक्त तीन हजार काेराेना लस शिल्लक

Corona Vaccination: जिल्ह्यात फक्त तीन हजार काेराेना लस शिल्लक

Next

- निखिल म्हात्रे

अलिबाग : मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत असले तरी जिल्ह्यात फक्त तीन हजार काेराेना लसींचा साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद पडणार आहेत. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये काही प्रमाणातच साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे लसीकरणाला नागरिकांनी फारसा उत्साह दाखवल्याचे दिसून आले नाही. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अन्य लसीकरण केंद्राची झाली हाेती. काही ठिकाणी तर नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागले आहे.

रायगड जिल्ह्यात सुरुवातीला कोव्हॅक्सिन आणि नंतर कोविशिल्ड अशा दोन्ही प्रकारच्या लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यानंतर अगदी सुरुवातीला या कोविड लसीकरण मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर मात्र या लसीकरणाबाबत लोकांमध्ये विश्‍वास वाढल्याने प्रतिसाद वाढला. लसीच्या मागणीप्रमाणे पुरवठा वाढला होता; परंतु लस घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने लसीकरण केंद्रांची संख्यादेखील वाढवण्यात आली.

जिल्ह्यात एकूण ८४ लसीकरण केंद्र असून त्यापैकी ५९ लसीकरण केंद्र सुरू आहेत तर २५ केंद्र लसीच्या कमतरतेमुळे बंद आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ३३ हजार १०९ जणांचे सलीकरण पूर्ण झाले आहे. तर ३ हजार ७८० डोस शिल्लक आहेत. मात्र, ते ही आजच्या लसीकरणात संपतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली. लसीकरणाचा वेगही मंदावला. त्यामुळे सुरुवातीला ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर मिळणारी लस लगेच मिळेनाशी झाली. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना लसीकरणासाठी पुढील तारीख मिळू लागली.

सरकार, प्रशासन सतर्क 
जिल्ह्यात काेराेनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डाेके वर काढले आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ३५ हजार ६७० आराेग्यसेवक आणि फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली आहे. 
४५ वर्षांच्या पुढे असणारे २३ हजार ९५७ नागरिक आहेत. ५५ हजार ७३१ ज्येष्ठ नागरिकांनीही लस घेतली आहे. 

जिल्हा साठवण केंद्रातील लसीचे वितरण झाले आहे. मिळालेल्या अहवालानुसार अनेक लसीकरण केंद्रांवरील लस संपली आहे. जेथे शिल्लक आहे तेथे एक दिवस पुरेल इतकाच साठा आहे. आम्ही नवीन लसीची मागणी केली आहे. ती उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण वेगाने सुरू होईल.
- डॉ. गजानन गुंजकर,
जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण

२५ केंद्रे बंद 
आराेग्य विभागाने सुरुवातीला ८० केंद्रांपैकी ५० केंद्रे बंद झाल्याचे सांगितले हाेते. त्यानंतर आज जिल्हा प्रशासनाने नव्याने आकडेवारी जाहीर करत फक्त २५ केंद्र बंद असल्याचे सांगितले. 
त्यामुळे समन्वयाचा अभाव असल्याचे समाेर आले आहे. मात्र, विश्र्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील लस संपली असल्याचे सांगितले आहे.

ग्रामीण भागात तुटवडा
जिल्हा मुख्य लस साठवण केंद्रातील लसींचा साठा संपला आहे. अनेक केंद्रांवरील विशेषतः ग्रामीण भागातील लसीकरण लसीअभावी थांबवण्यात आले आहे. तर ज्या केंद्रांवर लस शिल्लक आहे तेथे एक ते दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यासाठी आतापर्यंत १ लाख ३९ हजार १०९ जणांना लस देण्यात आली. तर १३ हजार ५८९ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. शहरी भागात बऱ्यापैकी लसीकरण झाले असले तरी ग्रामीण रायगडमधील नागरिक अजूनही लसीच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Corona Vaccination: Only 3,000 Corona vaccines remain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.