रायगड : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बुधवारी कोरोनाची लस घेतली. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना सायंकाळी पाच वाजता लस टोचण्यात आली. कोरोनाची लस सुरक्षित आहे. अखंड समाजाच्या सुरक्षेसाठी सदरची लस महत्वाची असल्याने सरकारच्या सुचनेनुसार सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. लस घेतल्यानंतरही नाका-तोंडाला मास्क लावा, सातत्याने हात स्वच्छ धुवा आणि सामाजिक अंतराचे भान ठेवा. सरकार आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करा, असेही आवाहन त्यांनी केले. (Dr. Appasaheb Dharmadhikari takes dose of COVID-19 vaccine)
सर्वत्रच कोरोनाचा प्रकोप सातत्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसींची भारतात निर्मिती करण्यात आली आहे. देशातील नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम सर्वत्र सुरु आहे.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वयाच्या 75 व्या वर्षी लस घेतली. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नर्स आश्विनी नाईक यांनी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना लस टोचली. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे चिरंजीव उमेशदादा धर्माधिकारी यांनी देखील लस घेतली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत घासे, डॉ. जुईली म्हात्रे, नर्स निशा कावजी यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.