Corona vaccine: मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला ‘खो’; आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 02:29 AM2021-03-28T02:29:05+5:302021-03-28T02:30:06+5:30
सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात १७ लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. यापैकी ६ शासकीय तर ११ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे.
वैभव गायकर
पनवेल : कोरोनाची लस १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वांना दिली जाणार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडण्याची शक्यता आहे. मागणीएवढा लसींचा पुरवठा न झाल्यास लसीकरणात खोडा पडण्याची शक्यता आहे. याकरिता पालिका प्रशासनाला तशी यंत्रणा उभारावी लागणार आहे. यापूर्वी सुरू झालेल्या लसीकरणात अनेक वेळा तांत्रिक तसेच साठ्याच्या अभावामुळे अनेकांना भरउन्हात रिकाम्या हाती परतावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करणे गरजेचे आहे.
सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात १७ लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. यापैकी ६ शासकीय तर ११ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. मात्र लसीकरण सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे खाजगी रुग्णालयात वेळेत लसींचा पुरवठा होत नसल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना वारंवार खाजगी रुग्णालयांत खेटे मारावे लागत आहेत. आता ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याने याकरिता केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे. यामध्ये आणखी रुग्णालये वाढविल्यास लसीकरण मोहीम अधिक सोपी होणार आहे.
४५ वर्षांवरील दीड लाख नागरिकांना करावे लागणार लसीकरण
पालिका क्षेत्रात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात साधारण ९ लाख लोकसंख्या आहे. या लोकसंख्येपैकी अंदाजे दीड लाख लोकसंख्या ४५ वर्षांवरील नागरिकांची आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी नागरिकांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे.
सध्या मागणी किती, साठा किती मिळतो?
सध्या दररोज किमान २००० लसींची मागणी आहे. मात्र यापैकी कोविशिल्ड लस पालिकेकडे उपलब्ध होत आहे. कोव्हॅक्सिनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी लाभार्थ्यांना लसीकरणाचा दुसरा डोस मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.
सध्या १७ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी आणखी खाजगी रुग्णालयांची यादी शासनाकडे पाठविली आहे. १७ केंद्रांशिवाय सोमवारी आणखी तीन खाजगी रुग्णालये व पनवेल शहरातील उरण नाका येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. - डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका