निखिल म्हात्रे
अलिबाग : कोरोना संकटाशी सामना करत एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे प्रत्येकजण लस कधी येणार याची वाट पाहत होते. एका वर्षानंतर सीरमने कोरोनावर लस तयार केली आहे. सीरममधून देशात कोविशिल्ड लसीचे वितरण करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातही कोविशिल्ड लस दाखल झाली आहे. नऊ हजार ७०० डोस हे ठाणे येथून वाहनाने रायगडात दाखल झाले आहेत. शनिवारपासून (दि. १६) जिल्ह्यात प्रत्यक्षात लसीकरण मोहीम सुरू होत आहे.
कोरोना महामारीने करोडो नागरिकांचा जीव घेतला आहे. कोविड १९वर लस शोधण्याचे प्रयत्न शास्रज्ञ वर्षभर करीत होते. मात्र त्यात यश थोड्या प्रमाणात मिळत होते. भारतात पुणे येथील सीरम कंपनीने कोरोना लसीचे संशोधन केले आहे. त्यामुळे आता कोविशिल्ड लसीकरण मोहीम जोरदार सुरू होणार आहे. कोविशिल्ड लस आता उपलब्ध झाली असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकतो.
लस साठवणुकीसाठी शीतसाखळी तयार
रायगड जिल्ह्यात एका वेळी आठ हजार ५५ लीटर लस साठवणूक करण्याची क्षमता आहे. जिल्ह्यातील एक जिल्हा शासकीय रुग्णालय,
६ उपजिल्हा रुग्णालय, ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रासह आठ ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येईल.
लस साठवणुकीसाठी शीतसाखळी तयार आहे. १०९ आइस लाइन फ्रीझर, ९८ डीप फ्रीझर, कोल्ड बॉक्स, व्हॅक्सिन करिअरसह यंत्रणा सज्ज.
लसीकरणासाठी प्रशिक्षित कर्मचारीरायगड जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आठ हजार ८९५ जणांना लस दिली जाणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर या सर्वांचे आधार कार्ड व इतर पुरावे पाहून त्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
असे होणार लसीकरण पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सेवक, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य केंद्रावर येणारे इतर संबंधित, आरोग्य क्षेत्राशी निगडित असलेल्यांना लस देणार आहे. पोलीस, सुरक्षारक्षक, होमगार्ड यासह फिल्डवर कार्यरत सर्वांचे दुसऱ्या टप्प्यात लसीकरण.
प्रथम लाभार्थींची तापमान, ऑक्सिजन तपासणी होईल. आयडी तपासून आत सोडले जाणार आहे. लसीकरण कक्षात गेल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यांना लस टोचली जाणार आहे. त्यानंतर लाभार्थींना त्रास होत असेल तर विश्राम कक्षात ३० मिनिटे बसवले जाणार आहे. - डाॅ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक