दासगाव : गेले काही दिवस सकाळी थंड आणि दुपारी कडक ऊन अशा वातावरणामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यातच जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे आणि त्याबाबत सोशल मीडियावर वाढत्या प्रचारामुळे मेडिकलमध्ये मास्क आणि सॅनिटायझरला मागणी वाढली आहे. याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून केले जात आहे.
गत आठवड्यात नागपूर, सातारा आणि विविध भागात अवकाळी पाऊस पडला. हिवाळ्याचा अंतिम टप्पा आणि उन्हाळ्याचा प्रारंभ यातच पाऊस पडल्याने वातावरणात बदल निर्माण झाला. सकाळी थंडी तर दुपारी उष्मा अशा द्विधा वातावरणात मानवी आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. यामुळे ताप, थंडी, खोकला अशा संसर्गजन्य आजारांचा त्रास अनेकांना होऊ लागला आहे. यामुळे दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. वातावरण बदलामुळे नागरिकांनी आहार कसा घेतला पाहिजे, याबाबत जागृती केली जात आहे. मात्र दुसरीकडे जगभरात कोरोनाचा फैलाव होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. महाड परिसरात मेडिकलमधील उपलब्ध साठा संपला असून वाढत्या मागणीमुळे मास्क उपलब्ध होत नसल्याने औषध व्यापारी चिंतेत आहेत.
हवामान बदलामुळे घसा खवखवणे, सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत आहे. यावर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, स्वच्छता, गरम पाणी पिणे हे रामबाण उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कोरोनासारख्या आजाराला घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजार वाढले आहेत. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाबाचे प्रमाण वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, घाबरून जाण्याऐवजी पुरेशी काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.बदलत्या तापमानामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सर्दी, ताप खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी कोरोनासारख्या आजाराला घाबरून न जाता योग्य ती काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. - डॉ. अजित पुल्ले, बालरोगतज्ज्ञ, महाडकोरोनाबाबत शासकीय पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण दिसून येत आहेत. - डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक, महाड