कोरोनाचा विषाणू जिल्ह्यावर पडला भारी, आठ दिवसातच 168 रुग्ण मृत्यूच्या दाढेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 09:47 PM2021-04-23T21:47:32+5:302021-04-23T21:48:07+5:30
पनवेल महापालिकेत सर्वाधिक मृत्यू
आविष्कार देसाई
रायगड - कोरोनाच्या विषाणूने जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल 168 रुग्णांचा गळा घोटला आहे. पैकी एकट्या पनवेल महापालिकेत 65 जण दगावले आहेत. दिवसाला बाराशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाचे प्रयत्न ताेकडे पडत असल्याचे दिसून येते.
कोरोनाचा विषाणू सध्या जिल्ह्यावर प्रचंड वेगाने आघात करत आहे. आतापर्यंत 96 हजार 126 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर 82 हजार 92 जण कोरोना मुक्त झाले आहेत. दोन हजार 27 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. सदरची आकडेवारी ही 22 एप्रिल 21 पर्यंतची आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळत नाही. वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पुरती ढेपाळली आहे. रुग्णांना वेळेवर बेड मिळत नसल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच फरफट होत आहे. सध्या 12 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पैकी तब्बल नऊ हजार 101 रुग्णांवर घरातच उपचार केले जात आहेत.गेल्या 15 दिवसांपासून रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने पुढे सरकत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चांगलीच झाेप उडाली आहे.
आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने जिल्ह्यात रुग्णाबाबत हेळसांड हाेत आहे. हे काही आता लपून राहीलेले नाही. गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल 168 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 15 एप्रिल रोजी 14 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 16 एप्रिल 14, 17 एप्रिल-19, 18 एप्रिल-15, 19 एप्रिल-25, 20 एप्रिल-20, 21 एप्रिल-19 आणि 22 एप्रिल रोजी 42 असे एकूण 168 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये एकट्या पनवेल महापालिकेमध्ये 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, कोरोना विषाणूचा होणारा फैलाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे, तसेच कोरोना लसीकरणही करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख 11 हजार 555 जणांनी कोरोनीच लस टोचून घेतली आहे. त्यामध्ये फ्रंट लाईन वर्करची संख्या 29 हजार 266, तर आरोग्य सेवकांची संख्या 27 हजार 910 आहे. 45 ते 60 वयोगटातील 74 हजार 838 नागरिकांचा समावेश आहे. 60 वर्षाच्या पुढे लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या 79 हजार 541 अशी आहे.