Corona Virus: माथेरानमध्ये कोरोना रुग्णाची अफवा; चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:03 PM2020-03-13T23:03:03+5:302020-03-13T23:03:18+5:30
माथेरान हे एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक येतात. फक्त पर्यटकांवर अवलंबून असलेले माथेरान हे एकमेव पर्यटनस्थळ आहे.
माथेरान : माथेरानमध्ये पर्यटनास आलेल्या एका विदेशी पर्यटकास कोरोनाची लागण झाल्याची बातमी काही माध्यमांनी दाखवल्याने माथेरानमध्ये खळबळ माजली होती. पण अधिक चौकशी केल्यानंतर ही अफवा असल्याचे समोर आले असून तसे नगरपालिकेच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.
माथेरान हे एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक येतात. फक्त पर्यटकांवर अवलंबून असलेले माथेरान हे एकमेव पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे येथील प्रत्येक बातमीचा प्रभाव पर्यटनावर होतो. गुरुवारी माथेरानमध्ये आलेल्या एका पर्यटक महिलेला कोरोनाची लागण झाल्याची बातमी पसरली. ही महिला चाळीस दिवसांच्या भारत भेटीवर असून माथेरानमध्ये मागील काही दिवसांपासून राहत आहे. या ठिकाणी ट्रेकिंगसाठी गेली असता तिला सर्दी व घसा दुखत असल्याचा त्रास जाणवल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. मात्र ती पूर्ण बरी झाली आहे. या प्रकरणी खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे माथेरानचे उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती आकाश चौधरी यांनी सांगितले.
माथेरानमध्ये कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळला नसून खोट्या माहितीच्या आधारे ज्यांनी वृत्त पसरवले त्यांना पालिकेमार्फत समज देण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. - प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान
सदर पर्यटक महिला माथेरान येथील रुग्णालयात सर्दीवर उपचार घेण्यास आली होती. तिच्यावर उपचार करून तिला घरी सोडण्यात आले. - उदय तांबे, वैद्यकीय अधिकारी, माथेरान