श्रीवर्धनमधील आरोग्यसेवेवर कोरोनाचे सावट; प्रसूती शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 11:54 PM2020-07-19T23:54:21+5:302020-07-19T23:54:27+5:30

महाड, अलिबागला जावे लागत असल्याने त्रास

Corona's attack on healthcare in Shrivardhan; Patients rush for obstetric surgery | श्रीवर्धनमधील आरोग्यसेवेवर कोरोनाचे सावट; प्रसूती शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची धावाधाव

श्रीवर्धनमधील आरोग्यसेवेवर कोरोनाचे सावट; प्रसूती शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची धावाधाव

googlenewsNext

- संतोष सापते

श्रीवर्धन : श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात स्त्री प्रसूती तज्ज्ञ व भूल तज्ज्ञ यांच्या अभावी प्रसूती शस्त्रक्रियासाठी श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील अनेक रुग्णांना अलिबाग व महाड या ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. अगोदरच कोरोना व चक्रीवादळ या दोन्ही संकटांनी सर्वसामान्य व्यक्ती त्रासलेला आहे. त्यात गरजेच्या वेळी उपचार मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

श्रीवर्धन तालुक्यात २००४ साली कोट्यवधी रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालयाची वास्तू बांधण्यात आली. या रुग्णालयात ५० बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी ४८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. श्रीवर्धन तालुका हा रायगड जिल्ह्यातील दुर्गम तालुका मानला जातो. आजमितीस श्रीवर्धन तालुक्यातील लोकसंख्या ८० हजारांच्या जवळपास आहे.

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय हे एकमेव रुग्णांसाठी आशेचा किरण आहे. ५ जुलै ते १४ जुलै या कालावधीत अवघ्या सहा नॉर्मल प्रसूती श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलेले आहेत. मात्र, प्रसूती शस्त्रक्रियासाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना प्रसूती शस्त्रक्रियेसाठी महाड, अलिबाग येथील रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहेत.

श्रीवर्धन ते महाड अंदाजे अंतर ८० किमी असून, श्रीवर्धन ते अलिबाग तर जवळपास १४८ किलोमीटर आहेत. श्रीवर्धन ते महाड जाण्यासाठी किमान दोन ते अडीच तास लागतात व श्रीवर्धन ते अलिबाग जाण्यासाठी किमान पाच ते साडेपाच तास लागतात. पावसाचे दिवस असल्याने सर्वसामान्य व्यक्तींना मोठ्या मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना खासगी वाहनाने महाड-अलिबागकडे जावे लागते. हा प्रवास खर्च हा सर्वसामान्यांना पेलवत नाही. सर्वसामान्य व्यक्तीच्या आरोग्यविषयी मूलभूत हक्काकडे तरी जिल्हा आरोग्य प्रशासन लक्ष द्यावे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे आरोग्यसेवेवर त्याचा अतिरिक्त ताण पडत आहे. श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील शासकीय, खासगी अनेक डॉक्टर कोरोनाने बाधित आहेत. काही डॉक्टर होम क्वारंटाइन झालेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

स्त्री प्रसूती तज्ज्ञ व भूल तज्ज्ञ यांच्या अभावी प्रसूती शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना महाड व अलिबागला पाठवावे लागत आहे. इतर रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार दिले जात आहेत.
- महेंद्र भरणे, वैद्यकीय अधिकारी, श्रीवर्धन

श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना दजेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी मी तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे. सद्यस्थितीत
अनेक रुग्णांना बाहेर गावात जाऊन वैद्यकीय सेवा घ्यावी लागत आहे.
- अनंत गुरव, नगरसेवक श्रीवर्धन नगरपरिषद

श्रीवर्धनमधील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. पालकमंत्री आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करतील. संबंधित रिक्त पदे तत्काळ भरली जातील.
- अनिकेत तटकरे, आमदार

माझ्या सांधेदुखीसाठी मी खासगी डॉक्टरकडे गेली असता, त्यांनी मला दवाखाना बंद असल्याचे सांगितले आहे.
- तारामती पवार, वृद्ध महिला श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाडमध्ये सरकारी रुग्णालयात प्रसूती, भूल तज्ज्ञ नसल्याने खासगी डॉक्टरांकडे मुलीला महाडला पाठवले. - कृष्णा रटाटे, रहिवाशी

Web Title: Corona's attack on healthcare in Shrivardhan; Patients rush for obstetric surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.