श्रीवर्धन : गेल्या चार महिन्यांच्या कालावधीनंतर श्रीवर्धन तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना हद्दपार होतोय असे वाटत असतानाच अचानक गेल्या दोन दिवसांत श्रीवर्धनमधील बाधितांची संख्या दोन आकड्यांवर पोहोचली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात करोनाबाधितांचा आकडा वाढलेला आहे. गेल्या चार महिन्यांत लोकांना कोरोनाचा विसर पडलेला दिसून आला. धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव, लग्नकार्य सर्वत्र सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाला. लग्नसमारंभ, हळदी समारंभ येथे लोकांनी अवाजवी गर्दी केली. राजकीय सभा, संमेलन, ग्रामपंचायत निवडणुकीची धावपळ यात सर्वत्र कोरोनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. श्रीवर्धन शहर व ग्रामीण भागात बाधित रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात गेल्यावर्षी रुग्णांचे प्रमाण जास्त होते. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचारासाठी सर्व आधुनिक सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधितांसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. ऑक्सिजन सिलिंडर, अत्याधुनिक रुग्णवाहिका व डॉक्टरांची टीम तयार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांकडून विविध ठिकाणी कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आजपर्यंत श्रीवर्धन तालुक्यात ४६१ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जनतेने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेतल्यास आगामी काळामध्ये श्रीवर्धनमधील परिस्थिती धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊन केल्यास मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना पुन्हा एकदा उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे. अंशतः सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद करण्याची वेळ तालुका प्रशासनवर येऊ शकते.
जनतेकडून कोरोनाकडे दुर्लक्षआम्हाला काहीच होत नाही, कोरोना झाला तर काय फरक पडतो ? आम्हाला लक्षणे नाहीत अशी विविध कारणे देत लोकांकडून राजरोसपणे नियमांचे उल्लंघन केले जाते. मास्क न वापरणे, जाणीवपूर्वक सोशल डिस्टन्सचा अवलंब करण्याय टाळाटाळ करणे, स्वतःची व इतरांची काळजी न घेणे अशा बाबी सर्रासपणे केल्या जात आहेत. चौकाचौकांत विनाकारण गर्दी केली जात आहे. हॉटेल, सार्वजनिक स्थळे या ठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसून येते. मच्छी मार्केट, किराणा दुकाने कुठेही नियमांचे पालन केले जात नाही. खासगी व सार्वजनिक वाहतूक सर्वत्र सहजासहजी नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
श्रीवर्धनमध्ये जनतेने कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर , सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा जनतेने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे.-सचिन गोसावी, तहसीलदार, श्रीवर्धन
कोरोना वाढीचा वेग लक्षात घेता सर्व जनतेने नियमांचे पालन करणे अगत्याचे आहे .घराच्या बाहेर पडताना कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याविषयी दृढनिश्चय करून निघावे.- समीर केळकर, रहिवासी, श्रीवर्धन