CoronaVaccine: लसीकरण थंडावले, नोंदणी करूनही नागरिक प्रतीक्षेत; महाड तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 11:57 PM2021-04-30T23:57:41+5:302021-04-30T23:57:49+5:30
महाड तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; वैद्यकीय व्यवस्था तोकडी
दासगाव : कोरोनाची दुसरी लाट घातक ठरत असतानाच दुसरीकडे लसीकरण सुरू केल्याने नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र, संपूर्ण राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर हा आशेचा किरण मावळत चालला आहे. महाडमध्ये गेल्या काही दिवसांपासून लसींचा अल्प पुरवठा होत असून लसीकरण करून घेण्यासाठी मात्र हजारो नागरिक नोंदणी करून देखील प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
महाड तालुक्यात प्रतिदिन ३० ते ५० या आकडेवारीत रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे वैद्यकीय व्यवस्थादेखील तोकडी पडू लागल्याने रुग्ण वगळता उर्वरित नागरिकांचे लसीकरण झटपट होणे आवश्यक आहे. गेले काही दिवस केवळ ४५ वयोगटावरील लोकांनाच लसीकरण केले जात होते मात्र आता १८ वर्षावरील लोकांना देखील लसीकरण केले जाण्याची घोषणा केली. मात्र, लसींचा पुरवठा होत नसल्याने रुग्णालयात लसीकरण थंडावले आहे.
महाड तालुक्यात पाचाड, वरंध, विन्हेरे, बिरवाडी, दासगाव, चिंभावे या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर तर महाड ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केले जात आहे. मात्र, याठिकाणी लसींचा साठा संपला आहे. आतापर्यंत जवळपास ७११३ नागरिकांचे लसीकरण केले गेले आहे. महाड ग्रामीण रुग्णालयात पहिला डोस २७९८ नागरिकांना तर दुसरा डोस ६४० जणांना देण्यात आला आहे.
महाड तालुक्याची लोकसंख्या जवळपास अडीच लाखांच्या वर गेली आहे. यातील १८ वर्षाखालील सोडले तरी सुमारे दोन लाख नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याने या आकडेवारीत डोस उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र सध्या लसीकरण काही टक्केवारीतच झाले आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढवल्यास महाडमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.