Coronavirus: रोह्यात बाधितांचा आकडा १००वर; सुदर्शनच्या कामगारांना कुटुंबीयांसह क्वारंटाईन होण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 01:41 AM2020-06-29T01:41:51+5:302020-06-29T01:41:59+5:30
सरकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांना साधं गरम पाणीही मिळत नाही. कोरोना रुग्णांचे हाल उपजिल्हा रुग्णालयात होत आहेत. अवस्था एवढी वाईट आहे की, त्यांना पाणी पिण्यासाठी बिसलेरी बॉटल विकत आणावी लागत आहे.
रोहा : कोरोनाच्या संकटाने रोह्याला आता विळखा घातल्याचे समोर येत आहे. बाधितांची संख्या शतकाकडे वाटचाल करीत असतानाच शहरातील एक रुग्ण मृत्य पश्चात कोरोना संशयित असल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. रोहा बाजारपेठेत ठिकठिकाणी पत्रे लावून बंद करण्यात आले असून सुदर्शन कंपनीच्या कामगारांनी तातडीने पालिकेकडे नोंद करण्याच्या सूचना रोहा नागराध्यक्षांनी केल्या आहेत. तर सुदर्शनच्या कामगारांनी कुटुंबियांसह क्वारंटाईन होण्याचे आदेश वरसे ग्रामपंचायतीच्या वतीने दिले आहेत.
सुरूवातीला कासवगतीने धावणाऱ्या कोरोना व्हायरस आता मात्र सुसाट वेगाने धावत आहे. शनिवारी एकाच दिवशी १५ बाधित रूग्ण मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. १५ पैकी ११ बाधित हे धाटाव एमआयडीसीतील कामगार असल्याने आतापर्यंत कंपनीतील १३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात अधिक आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शासनाचे नियम पायदळी तुडवून केवळ प्रोडक्शन टार्गेट करणाºया सुदर्शन कंपनी व्यवस्थापनेच्या हलगर्जीमुळे कोरोनाने रोह्याला विळखा घातला आहे. बाधितांची संख्या शतकाकडे वाटचाल करत आहे.
एमआयडीसीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रविवारपासून शुक्रवारपर्यत धाटाव मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकंदरीत सुदर्शन कंपनीचा फाजील आत्मविश्वास रोहेकर व धाटावकरांना नडला आहे. शहरासमवेत ग्रामीण भागात देखील कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक कंपनीत ५० टक्के कामगार कपात करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, सुदर्शन कंपनीने नियम पायदळी तुडवत पुणे, मुंबईतील कामगारांचा भरणा केला. त्या कामगारांना ताप, खोकला इत्यादी त्रास होऊ लागल्याने ते बाधित कामगार शहरातील अनेक डॉक्टरांकडे उपचाराकरिता विनंती करत होते; परंतु तुम्ही शासकीय रूग्णालयात उपचार घ्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. बाधित कामगार मदतीसाठी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेले असता पावसाळा सरू झाला आहे. त्यामुळे लहान सहान आजार होत असतात त्याकडे दुर्लक्ष करा असे थातूर मातूर उत्तर देत कंपनी व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम आज रोहेकर भोगत आहेत. कामगार व त्यांच्या कुटुंबियांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.
धाटावमध्ये ११ जण, तर सुदर्शनमधील बाधितांची संख्या १३
धाटाव एमआयडीसीतील बाधित कामगारांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. धाटाव येथील अनेक कामगारांची आरोग्य तपासणी केल्यानंतर शुक्रवारी एक तर शनिवारी तब्बल ११ जण बाधित असल्याची बाब समोर आली आहे. सुदर्शन कंपनीतील कामगार बाधितांची संख्या १३ वर पोहोचली असून, त्यात १० पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे. कंपनीतील कामगारांच्या हलगर्जीमुळे वरसे, अष्टमी व शहरातील पंचायत समिती कार्यालयाशेजारी असणाºया दत्तसागर हौसिंग सोसायटीमध्ये कोरोनाने शिरकाव केला. शहरातील व्यापाºयाच्या दुकानात काम करणाºया दोन तरुणी कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. दोघींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शेणवई व भिसे या ग्रामीण भागातील गावात कोरोनाने शिरकाव केला. शासनाच्या यादीत या गावांचा समावेश झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
२० तास रुग्णवाहिका मिळाली नाही
बाधित व्यापाºयाच्या कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह असल्याचे २५ जून रात्री उशिरा निदान झाले. या कुटुंबाला रु ग्णालयात दाखल करण्यासाठी गुरुवारी रात्रीपासून प्रयत्न सुरू झाले. नगरसेवक राजेंद्र जैन हे प्रशासनाला वारंवार संपर्क करित होते. असे असतानाही २० तासांहून अधिक काळ साधी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. गेल्या महिन्यात मालसई येथे दिवसभर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नव्हती, रायगड्मध्ये कोविडसाठीचे शासकीय नियोजन शून्य आहे ते दुसºयांदा स्पष्ट झाले, रात्र होईपर्यंत ती इमारतही सील करता आली नाही.
तालुक्यात ७२ बाधित
चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतरही शहरात कोरोनाने प्रवेश केलेला नव्हता, परंतु एका व्यापारी आणि सुदर्शन कंपनीतील कामगार व त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आतापर्यंत तालुक्यात ७२ जण बाधित असून ४६ जणांवर औषधोपचार सुरू आहेत, तर २६ जण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शहरातील अंधार आळी येथील एक रुग्ण मृत्युपश्चात कोरोना संशयित असल्याचे समोर आले आहे. जैन मंदिरापासून राम मारुती चौक व आडवी बाजारपेठ, बोरी गल्लीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
कोविड रुग्णांना गरम पाणी नाही
सरकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांना साधं गरम पाणीही मिळत नाही. कोरोना रुग्णांचे हाल उपजिल्हा रुग्णालयात होत आहेत. अवस्था एवढी वाईट आहे की, त्यांना पाणी पिण्यासाठी बिसलेरी बॉटल विकत आणावी लागत आहे. स्वयंसेवी संस्था रुग्णांना जेवण आणि पाणी देतात. रुग्णांचे कुटुंब, प्रशासन आणि रुग्णालय यांच्याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.