अलिबाग : रायगड जिल्ह्यातील आतापर्यंत २३ संशयीतांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहेत. त्यातील १९ संशयीत एकट्या पनवेल महापालिका क्षेत्रातील आहेत, तर दोन खालापूर आणि प्रत्येकी एक संशयीत हे खोपोली आणि मुरुड तालुक्यातील आहेत, अशी माहिती जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद गवई यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मुरुड तालुक्यातील संशयीत सिंगापूरला जॉब करण्यासाठी गेला होता. शनिवारी त्रास जाणवू लागल्याने त्याला प्रथम अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. दुपारनंतर कस्तुरबा रुग्णालयामधील विलीगीकरण कक्षात नेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. परदेशातून भारतामध्ये आणि प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यातील सर्वांनाच विविध ठिकाणच्या निगरानी कक्षात ठेवण्यात आले आहे.२० मार्च २०२० पर्यंत २२ संशयीतांना कस्तुरबा येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यामध्ये १९ संशयीत हे पनवेल महापालिका हद्दीतील आहेत, तर खालापूर तालुक्यातील दोन आणि खोपोलीमधील एका संशयीताचा समावेश आहे. पैकी १६ संशयीताचे नमुने घेण्यात आले. त्यातील एकच पॉझीटीव्ह आढळला होतो, तर १४ जणांचा अहवाल नेगीटिव्ह आला आणि एकाच अहवाल प्रलंबीत आहे. सहा जणांचे नमुने घेण्याची गरज नसल्याने त्यांचे नमुने घेण्यात आले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.अलिबागमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या व्यक्तीची प्रकृती व्यवस्थीत असल्याने तीला तीच्या घरीच निगरानी खाली ठेवण्यात येणार आहे. लंडनवरुन आल्याने तीला निगरानी कक्षात त्यानंतर विलीगीकरण कक्षात ठेवले होते.
Coronavirus : रायगडमधील २३ संशयित कस्तुरबात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:30 AM