coronavirus : २९ हजार नागरिकांना टंचाईची झळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:40 AM2020-04-28T01:40:33+5:302020-04-28T01:40:43+5:30
कोरोनाशी दोन हात करताना जिल्हा प्रशासनाने १७ टँकरच्या माध्यमातून तब्बल २९ हजार ४३७ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू केला आहे.
आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिक गहिरे होत असतानाच जिल्ह्यातील १८१ गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. कोरोनाशी दोन हात करताना जिल्हा प्रशासनाने १७ टँकरच्या माध्यमातून तब्बल २९ हजार ४३७ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा पेण तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातील २२ हजार ५८६ नागरिकांना पाणी-पाणी करावे लागत आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनासह सर्वच सरकारी यंत्रणा झटत आहेत. अलिबाग, पेण, पाली, रोहा, तळा, मुरूड, म्हसळा, महाड, माणगाव या नऊ तालुक्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे हे तालुके ग्रीन झोनमध्ये आहेत. मात्र पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, श्रीवर्धन आणि पोलादपूर या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.
दुसरीकडे रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. नागरिकांना संचारबंदीमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी तर नागरिकांना विकतचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. गावागावातील नदी, तलाव, विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे, तर विविध बोअरवेलमधील पाणी आटत चालले आहे. उन्हाचा तडाखा आगामी कालावधीत वाढण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
१५ तालुक्यांपैकी ज्या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे अशा तालुक्यांतील गावे, वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका पेण तालुक्याला बसला आहे. येथील १० गावे, ७४ वाड्यांमधील एकूण २२ हजार ५८६ नागरिकांना सात खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील चार गावे, दोन वाड्यांतील दोन हजार ८९६ नागरिकांना एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी येथे एका सामाजिक संस्थेची मदत घेण्यात आली आहे. महाड तालुक्यातील पाच गावे आणि ३७ वाड्यांमधील एकूण दोन हजार ३६५ नागरिकांना चार खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलादपूर तालुक्यातील १४ गावे आणि ३५ वाड्यांमधील एकूण एक हजार ५९० नागरिकांना पाच खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
>नियमित पाणीपुरवठा करावा - जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी पेण, रोहा, महाड, पोलादपूर या चार तालुक्यांमधील एकूण ३३ गावे, १४८ वाड्या असे मिळून एकूण १८१ गाव/वाड्यांमधील एकूण २९ हजार ४३७ नागरिकांना खासगी आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने १७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली. पाण्याची गंभीर समस्या उद्भवणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणेने सतर्क राहावे. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्वच यंत्रणांना
दिले आहेत.