coronavirus: पनवेल रेल्वे स्थानकावर 4,856 प्रवाशांची केली तपासणी, २९ प्रवासी पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 02:22 AM2020-12-08T02:22:37+5:302020-12-08T02:23:37+5:30
Panvel coronavirus: पनवेल रेल्वे स्थानकात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या प्रवाशांच्या कोविड चाचणीकरिता ४,८५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यापैकी २९ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत.
- वैभव गायकर
पनवेल : कोविडचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने वेळोवेळो विविध निर्बंध लागू केले आहेत. याचाच भाग म्हणून रेल्वे व रस्ते वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची कोविड टेस्ट करण्याचे राज्य शासनाने निश्चित केल्यानंतर संबंधित कोविड टेस्टला सुरुवात झाली आहे. याचसाठी पनवेल रेल्वे स्थानकात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या प्रवाशांच्या कोविड चाचणीकरिता ४,८५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यापैकी २९ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत.
दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा आदींसह लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान आलेल्या ६२ ट्रेनच्या प्रवाशांच्या तपासणीत सुमारे २९ प्रवासी पॉझिटिव्ह निघाले आहेत. या रुग्णांपैकी १६ प्रवाशांना पालिकेने स्थापन केलेल्या टियारा हॉल येथील कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित केले आहे. तर उर्वरित १३ प्रवाशांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. रेल्वे स्थानकांवर पालिकेचे दोन पथकांत प्रत्येकी चार असे एकूण आठ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, टेक्निशयन, फार्मासिस्ट आणि सिस्टरचा समावेश आहे.