- आविष्कार देसाईअलिबाग : कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतामध्येही परदेशी नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. शैक्षणिक, पर्यटन, बिझनेस, वर्क व्हिसावर परदेशी नागरिक विविध राज्यांमध्ये वास्तव्यास आहेत. रायगड जिल्ह्याचा विचार केल्यास सध्या ५७ परदेशी नागरिक विविध प्रकारच्या व्हिसावर जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचे पोलिसांच्या अहवालानुसार स्पष्ट होते. आधीपासूनच परदेशी नागरिक हे रायगड जिल्ह्यात वास्तव्यास असल्याने ते सुरक्षित आहेत आणि त्यांच्यापासून कोणताही धोका नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेली एक व्यक्ती सापडली आहे. तिच्यावर कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही व्यक्ती इराणहून आली होती. सुरुवातीला पनवेल येथील विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यानंतर त्याचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले. खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत. दुबई-शारजा येथे ८ मार्च ते १३ मार्च या कालावधीत १० पीएल क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी रायगड जिल्ह्यातील काही खेळाडू शारजा येथे गेले होेते. ते १४ मार्चला परतल्यानंतर त्यांची विमानतळावर तपासणी केली होती. त्यानंतर त्यांना पनवेल येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे काहींना सोडण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या सक्त आदेशानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. त्यातील तीन जणांना रविवारी १५ मार्च रोजी अलिबाग येथील सारंग सरकारी विश्रामगृहातील निगराणी कक्षात ठेवण्यात आले. त्यामध्ये सोमवारी १६ मार्च रोजी आणखीन तीन व्यक्तींची भर पडल्याने त्यांची संख्या आता सहा झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी ‘लाकेमत’ला दिली. त्यांना कसलाच त्रास होत नाही तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या पुरेशा सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पुढील १४ दिवस त्यांना निगराणीखाली ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या जिल्ह्यामध्ये तब्बल ५७ परदेशी नागरिक विविध कारणांनी वास्तव्यास आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक कोरियन रिपब्लिक देशातील २६ नागरिकांचा समावेश आहे. येमेन ८, साऊथ आफ्रिका ६, जापान, पाकिस्तान प्रत्येकी ४, यूके ३, जर्मनी आणि अफगाणीस्तान प्रत्येकी २, इस्रायल आणि श्रीलंका देशातील प्रत्येकी १ नागरिकाचा समावेश आहे.चिनी नागरिकांची तपासणीयातील बहुतांश परदेशी नागरिक हे आधीपासूनच वास्तव्यास आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत त्यांच्यावर संशय घेण्याचा प्रश्न नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.मध्यंतरी एक महिनाभरापूर्वी एका खासगी कंपनीमध्ये चीनमधून काही अभियंते आणि कामगार आले होते. मात्र कोरोनाच्या भीतीने त्यांना कंपनीने कामावर घेण्यास नकार दिला होता.या चिनी नागरिकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळली नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी सांगितले.
Coronavirus : रायगडमध्ये विविध देशांतील ५७ परदेशी नागरिक वास्तव्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 2:31 AM