अलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी पाच नवे बाधित रूग्ण आढळल्याने रूग्णांची संख्या ५७ झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन आणि पनवेल महापालिका प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, पनवेल, खारघर, कामोठे आणि कळंबोली येथे प्रत्येकी एक असे एकूण पाच पॉझिटिव्ह रुग्ण मंगळवारी आढळून आले. आतापर्यंत कोमोठे येथील तीन, खारघर येथील एक आणि सीआयएसएफ कँम्पमधील पाच असे एकूण नऊ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पनवेल आणि पोलादपूर येथील रुग्णाचा समावेश आहे.पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये २० एप्रिलपर्यंत ३५ कोरोना बाधीत होते. त्यामध्ये मंगळवारी चार रुग्णांची भर पडल्याने हि संख्या ३९ झाली आहे, तर रायगड ग्रामीणमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ होती. त्यामध्ये मंगळवारी एकाची भर पडल्याने हा आकडा १८ झाला आहे. पनवेल महापालिका आणि रायगड ग्रामीणमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७ वर जाऊन पोचली आहे. सुरुवातीला पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्येच कोरोनाग्रस्तांचा आकडा दिसून येत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई-पुण्यातील नागरिकांनी हजेरी लावल्याने परिस्थिती बिघडली आहे.दरम्यान, प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यकत्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे रायगड जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर न पडता. घरात राहूनच कोरोनाचा मुकाबला करावा आणि प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी वेळोवेळी केले आहे.
CoronaVirus: रायगड जिल्हा, पनवेल महापालिका क्षेत्रात ५७ जणांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 3:01 AM