coronavirus: रायगडमध्ये हाेम आयसाेलेशनमध्ये ९४१ कोरोनाबाधित रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:58 AM2020-10-28T00:58:23+5:302020-10-28T00:59:12+5:30
Raigad News : नागरिकांच्या सजगतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. जिल्ह्यात ५३ हजारांहून अधिक व्यक्तींना बाधा झाली होती. सध्या ९४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
- निखिल म्हात्रे
अलिबाग: कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या बी प्लॅन असलेल्या होम आयसोलेशनला यश आले असून, नागरिकांच्या सजगतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. जिल्ह्यात ५३ हजारांहून अधिक व्यक्तींना बाधा झाली होती. सध्या ९४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. पनवेल पालिका क्षेत्रात सर्वात जास्त ८८५ रुग्ण आढळले आहेत. तळा तालुक्यात ० तर सुधागड, श्रीवर्धन तालुक्यात १ रुग्णाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात बाधित रुग्णांची आजची संख्या १ हजार ६०५ आहे. यातील ९४१ रुग्ण हे घरीच उपचार करून घेत आहेत. त्यामुळे रुग्णांवर आलेले मानसिक दडपण कमी झाले आहे, तसेच नागरिकांमध्ये आता सजगता आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर आले आहे.
गृह विलगीकरण (वयानुसार)
जिल्ह्यात सध्या होम आयसोलेशनमध्ये ९४१रुग्ण आहेत. सर्वात जास्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ८८५, सर्वात कमी तळा तालुक्यात शुन्य रुग्ण आहेत. सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आसली तरी काळजी घेण्याची गरज
आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर काही रुग्णांनी घरी राहून उपचार घेण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यात ९४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून, आरोग्य विभागामार्फत त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. ९५ टक्के रुग्ण बरे झाले असून, लवकरच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी
गृह विलगीकरणासाठी काय अटी?
गृह विलगीकरणासाठी राहिलेल्या रुग्णाने स्वत: एकाच रूममध्ये राहावे, घरातील इतर व्यक्तींशी संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी. रुग्णाला दिलेले औषधोपचार त्याने वेळेवर घ्यावे, तसेच पोषक आहार करावा. दिवसातून एकदा ऑक्सिजन लेव्हल तपासावी. थोडेसेही अस्वस्थ वाटत असेल, तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.
मनोबल वाढविण्याचा केला जातो प्रयत्न
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाची आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी रोज आरोग्य विभागामार्फत रुग्णास फोन केला जातो. रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल व त्याच्या तापमानाची माहिती घेतली जाते.
तसेच रुग्णाला आरोग्यविषयक सल्ला देऊन त्याचे मनोबळ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व कारणांमुळे
रुग्णांना देखिल दिलासा मिळत आसल्याचे दिसुन येत आहे.