- आविष्कार देसाईरायगड : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असतानाच रायगड जिल्ह्यातही तो चांगलाच फोफावला आहे. कोरोनाची चाचणी करण्यासाठी अलिबाग येथील सरकारी रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड प्रयोगशाळेत आतापर्यंत तीन हजार ५६ रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. प्रयोगशाळा उभारण्यात आल्याने अहवाल लवकर प्राप्त होऊन संबंधित रुग्णांवर उपचार करणे सोपे जात आहेत.मार्च महिन्यापासून सातत्याने कोरोनाचा आलेख वाढताच राहिला आहे. संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब टेस्ट करण्यासाठी मुंबईतील विविध प्रयोगशाळेमध्ये पाठवावे लागत होते. त्यामध्ये अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी उशीर होत होता. यावर उपाययोजना करण्यासाठी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यासाठी कोविड प्रयोगशाळा असावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे लावून धरली होती. काही कालावधीनंतर त्यांच्या मागणीला यश आले. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयातील इमारतीमध्ये कोविड प्रयोगशाळा उभारण्यास सरकारने मान्यता दिली. यासाठी एक कोटी सात लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते २१ आॅगस्ट रोजी अलिबाग येथील कोविड प्रयोगशाळेचे आॅनलाइन उद्घाटन करण्यात आले होते. जिल्ह्याच्या ठिकाणी कोविड प्रयोगशाळा उभारण्यात आल्याने सर्वांच्याच सोयीचे झाले आहे.२८ आॅगस्टपर्यंत तब्बल तीन हजार ५६ रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली असल्याची माहिती कोविड प्रयोगशाळेच्या नोडल अधिकारी डॉ.शीतल जोशी यांनी दिली. पैकी एकूण ५८० स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत, तर एकूण दोन हजार ४७६ रुग्णांचे स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत, असेही डॉ.जोशी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यासाठी प्रयोगशाळा दिल्याने सर्वांच्याच सोयीचे झाले आहे. एखाद्या रुग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर किमान २४ ते ३६ तासांमध्ये अहवाल मिळण्यास मदत होत आहे.या लॅबमुळे दिवसाला किमान ९४ तर जास्तीतजास्त ३७६ चाचण्या करता येणार आहेत. वेळेची बचत होऊन उपचार करण्यासाठी अवधी मिळणार आहे. नागरिकांना जास्तीतजास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.- डॉ.सुहास माने,जिल्हा शल्यचिकित्सक,रायगड
coronavirus: अलिबागच्या कोविड प्रयोगशाळेचा जिल्ह्याला फायदा, अहवाल लवकर मिळत असल्याने उपचार वेळेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 1:04 AM