माणगाव /म्हसळा : देशामध्ये कोरोना-१९ या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी उपाययोजना करण्याची खबरदारी घेतली आहे; परंतु पळवाट काढत मुंबईतील चाकरमानी आपल्या मूळगावी जात आहेत. यामुळे कोकण परिसरात कोरोनाची आता लक्षणे आढळली असल्याने जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत पूल सील करण्यात आला आहे.
या कोरोना विषाणूचा शिरकाव प्रभावित क्षेत्रातून रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात प्रादुर्भाव व लक्षणे आढळल्याने तालुका व आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा पूल पूर्णत: बंद करण्यात आला असून आता या पुलावरून कोणालाही ये-जा करता येणार नाही. मंडणगड आणि दापोली तालुक्यात मुंबईहून आंबेतमार्गे पायवाटेने चालत आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांमध्ये कोरोनाची लक्षणे शासकीय तपासादरम्यान आढळून आल्याने जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलावरील मुख्य मार्ग हा संपूर्णत: बंद केला असून, आता यावरून कोणालाही प्रवेश करता येणार नाही, असे आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच सा.बा.विभागाचे अधिकारी खामकर यांनी सांगितले.यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुख्य महामार्ग व सागरी महामार्ग तसेच इतर जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येणाºया रस्ते वाहतुकीला जिल्हाधिकारी रत्नागिरी तसेच रायगड यांनी बंदचे आदेश दिले आहेत.
दुसरीकडे या दोन्ही जिल्ह्यांचा मुख्य मार्ग असलेल्या या पुलाचा भागच बंद केल्याने नागरिकांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेली आंबेत आणि म्हाप्रळ ही गावे पूर्णत: सर्वतोपरी एकमेकांच्या देवाण-घेवाण पद्धतीवर अवलंबून असून या विभागात रेशनिंग दुकाने, दवाखाने, भाजीमार्केट, फलोत्पादन, मेडिकल, बँक या पलीकडे असल्याने नागरिकांनी याच गोष्टीचा विचार करत बंद करण्यात आलेल्या पुलामुळे तीव्र संताप व्यक्त केला. या वेळी दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील नागरिकांनी शासनाच्या या चुकीच्या धोरणाचा तसेच नागरिकांना विचारात न घेता नाकाबंदी करण्यात आल्याबाबत नाराजी व्यक्त केली. हातावर पोट असलेल्या मोलमजुरांचाही या पुलावरून ये-जा करत उदरनिर्वाह चालू असतो. त्यामुळे पूर्णत: बंद करण्यात आलेल्या पुलाच्या या निर्णयामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ येईल हे मात्र निश्चित, असे मत सामाजिक कार्यकर्ते फरीद डावरे यांनी व्यक्त केले.आंबा व्यापारी चिंतेतसध्या आंबा फळाची निर्यात सुरू असून कोकणातील हापूस हा जास्तीत जास्त मुंबईतील एपीएमसी मार्केटला जात असतो. त्यामुळे कोकणातील शेतकरी हा या फळावर जास्तीत जास्त अवलंबून असतो आणि त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालवत असतो. मुंबई दिशेला जाणारा मुख्य मार्ग असलेल्या आंबेत पुलाची वाहतूक पूर्णत: बंद केल्याने अशा फळव्यापारी, बागायतदारांवर खूप मोठे संकट आले असून त्यांना आता कशेडी मार्गे मुंबईकडे प्रवास करावा लागणार आहे.अत्यावश्यक सेवा नागरिकांना जावे लागणार गोरेगावला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबेत-म्हाप्रळ पूल हा पूर्णत: वाहतुकीस तसेच आर्थिक व्यवहारासाठी बंद करण्यात आला असून, आंबेत येथील नागरिकांना आता चक्क गोरेगाव गाठावे लागणार असून जिथे दोन किमी अंतरावर काम होत होते तिथे आता १४ किमी अंतर पार करून आपली कामे करण्यास हेलपाटे मारावे लागणार असल्याने आंबेत-म्हाप्रळ परिसरातील जनतेत नाराजीचे वातावरण आहे.