दासगाव : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने महाडमध्येही हाहाकार घातला आहे. सध्या दर दिवशी एक-दोन रुग्ण सापडत असल्याने संपूर्ण महाड तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन महिन्यांमध्ये ५२ रुग्ण कोरोनाबाधित सापडले असून, त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. समूहामधून संसर्ग होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असले तरी महाड शहरातील आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा आजही गजबजलेल्या आहेत. त्यामुळे वेळीच गर्दीवर नियंत्रण ठेवले नाही तर पुढे कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबई-पुण्यासारख्या शहरामध्ये सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. महाड तालुका काही महिने सुरक्षित राहील, असे वाटत होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून या रोगाने मान वर काढण्यास सुरुवात केली. बघता-बघता तालुक्यात कोरोनाचे ५२ रुग्ण सापडले. त्यामधून सात रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तरी महाड तालुक्यात दर दिवशी कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात सहा रुग्णांचे उपचार होतील, अशी सोय करण्यात आली आहे. तर चार व्हेंटिलेटर असून, गॅसही उपलब्ध आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर महाडमधील नवीन बांधण्यात आलेल्या पोलीस वसाहतीच्या इमारतीमध्ये उपचार करण्यात येत आहेत. सहाव्यतिरिक्त अधिक धोका असलेल्या रुग्णांना उपचारसाठी अलिबाग किंवा मुंबई येथे पाठविण्यात येत असल्याची माहिती महाड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक भास्कर जगताप यांनी दिली.
महाडमध्ये जरी कोरोनाचे रुग्ण बरे होत असतील, तरी मोठ्या संख्येने वाढ झाली, तर त्यावर नियंत्रण आणणे अवघड होणार आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावर कसे नियंत्रण आणता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. सध्या ग्रामीण भागातील नाके आणि महाड शहरातील बाजारपेठा गजबजलेल्या आहेत, यामुळे धोका वाढत आहे.रायगड जिल्ह्याची सीमा बंद करण्याची मागणीसध्या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. या जिल्ह्याला जोडणारी रत्नागिरी जिल्ह्याची हद्द आहे. त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात कोरोना पसरत आहे. त्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपली हद्द कशेडी गाव ठिकाणी बंद केली आहे. त्या ठिकाणी अनेक महसूल कर्मचारी, तसेच पोलीस फोर्स तैनात करण्यात आले आहे. मात्र, कोणालाच रत्नागिरी जिल्ह्यात विनापास प्रवेश दिला जात नाही. रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडमध्ये येणाºया वाहनांची कोणतीच तपासणी न करता खुलेआम वाहने प्रवेश करत आहेत. अशा वेळी रत्नागिरीतून येणाऱ्यांपासून रायगडला कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. तरी रायगड जिल्हाधिकाºयांनी त्या ठिकाणी आपली ही हद्द बंद करावी, जेणेकरून या हद्दीला जोडले गेलेले रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि महाड हे दोन तालुके सुरक्षित राहतील, असे नागरिकांचे मत आहे.