अलिबाग : अनलॉकनंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे सरकार लॉकडाऊन करणार नाही. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी आणि नागरिक यांना विश्वासात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था लॉकडाऊन करु शकतात, असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
अलिबाग येथील राजस्व सभागृहात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिक विविध ठिकाणी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यावेळी कोणतीच दक्षता घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे व्यावसायिक, दुकानदार यांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. सरकार आता लॉकडाऊन करणार नाही. स्थानिक पातळीवर नगराध्यक्ष हे व्यापारी, व्यावसायिक, नागरिक यांना विश्वासात घेऊन तसा निर्णय घेऊ शकतात, असे तटकरे यांनी सांगितले. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कच वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, यासाठी अलिबाग-वरसोली आणि श्रीवर्धन-दिवेआगर येथे शाक्स उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे एमटीडीसी रिसार्ट, जमिनी या भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहेत. अग्रो टुरिजमचा व्यवसाय करताना आता त्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. नारळ आणि सुपारीच्या बागांना अद्याप नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. कारण निकषानुसार हेक्टरी देण्यात येणारी मदत ही तुटपुंजी असणार आहे. यासाठी झाडांमागे त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले.नियमांचे पालन करणे गरजेचेजेएसडब्ल्यू कंपनीमधील कोरोनाबाधित व्यक्तीची माहिती लपविली जात असल्यास याबाबत त्यांना निर्देश देण्यात येतील, तसेच त्यांनी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.