आदिवासींच्या जीवनशैलीमुळे कोरोना कोसो दूर; निसर्गाच्या सान्निध्यामुळे प्रतिकारशक्तीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:39 AM2020-06-28T00:39:34+5:302020-06-28T00:40:11+5:30
पनवेल तालुक्यातील आदिवासी पाड्यावर रुग्ण नाही
अरूणकुमार मेहत्रे
कळंबोली : कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे, परंतु पनवेल तालुक्यातील आदिवासींच्या जीवनशैलीने कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूला कोसो दूर ठेवल्याचे दिसून येत आहे. या आदिवासी पाड्यावर आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेले नाही.
पनवेल महापालिका, तसेच ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘पुन:च्छ हरिओम’ झालेल्या परिसरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु पनवेल तालुक्यातील ८५ आदिवासी पाड्यांवर अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. कोरोलवाडी, घेरावाडी, बानूबायवाडी, लहूचीवाडी, आखाडावाडी, काशीमाळ, विठ्ठलवाडी, खैरातवाडी, भोकरवाडी, डुंगीचीवाडी, त्याचबरोबर माळडुंगी, वाजे, मोरबा, गरगळी, वारजोली, शेरोली, भेकरा, खारघर दामोळे, बेरले या परिसरातील आदिवासी पाड्यांवरील ४,१९६ कुटुंबे निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्य करतात. दररोज कठोर परिश्रम करतात. शेती, मोलमजुरी, रानभाज्या व लाकडाच्या मुळी विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवतात.
निसर्गाच्या सान्निध्यात वावरत असल्याने त्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. तीन महिन्यांपूर्वी कोरोना रोगाचा संसर्ग होऊ लागला, तेव्हा पनवेल परिसरासह तालुक्यात लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे आदिवासी पाड्यांवर उपासमारीचा सामना करावा लागला. शासनाकडूनही तत्काळ मदत मिळाली नाही. तेव्हा काही सामाजिक संस्थांनी आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप, मास्क, साबण, सॅनिटायझरबरोबर कोरोनाबाबत जनजागृती केली. पंचायत समिती, तसेच ग्रुप ग्रामपंचायत यांच्या माध्यमातूनही आजाराविषयी माहिती देण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता पाळणे, साबणाने हात धुणे, मास्क यांचे उपयोगही सांगितले.
शहराशी संपर्क येऊनही आदिवासी खंबीर
आदिवासी पाड्यांवरील नागरिक पनवेल बाजारपेठेत दररोज रोजंदारीवर काम करतात. रानभाज्या, लाकडाच्या मोळी विकणे, मोलमजुरी करणे आदींसाठी पनवेल शहरात प्रवेश करतात, परंतु आद्याप या वस्ती-वाड्यावर कोरोनाने शिरकाव केलेला नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घेणे, जीवनशैली चांगली राखणे अत्यंत महत्वाचे असल्याचे यावरून कळते.