Coronavirus: बाळा, आता थोडा वेळ तरी हातात अभ्यासाचे पुस्तक घे! पालकांची मुलांना विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:29 AM2021-03-24T00:29:10+5:302021-03-24T00:29:27+5:30
पनवेल महापालिका क्षेत्रासह तालुक्यात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा २८ जानेवारीपासून सुरु झाल्या. या अगोदर नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु झाले होते.
कळंबाेली : पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा, वर्ष संपले तरी सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे लहान मुलांना आता शाळेचा विसर पडला आहे. दिवसभर घरीच खेळणे नित्याचेच झाले आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सोडले तर ग्रामीण भागात आजही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अधुरा राहिला आहे. शहरातही परिस्थिती वेगळी नाही . अभ्यासापासून दूर जाणाऱ्या मुलांना आता थोडा वेळ तरी पुस्तक घे…. म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रासह तालुक्यात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा २८ जानेवारीपासून सुरु झाल्या. या अगोदर नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु झाले होते. तेव्हा पुन्हा शाळा लहान मुलांनी गजबजणार असे वाटत होते. परंतु तसे काही घडले नाही. पनवेल तालुक्यात पहिली ते चौथी पर्यंतच्या ५५५ शाळा आहेत. तर ७६७४५ विद्यार्थी संख्या आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पनवेल पालिका परिसरातील पाचवी ते आठवी पर्यंतच्या सुरु असलेल्या शाळा बंद करण्यात आल्या . खासगी शाळा तर वर्षभरापासून बंदच आहेत. फक्त ऑनलाईन शिक्षण देण्यावर शाळेकडून भर दिला गेला . पाचवी ते आठवी पर्यंत तालुक्यात शाळा आजही सुरु आहेत. परंतु म्हणावी तशी उपस्थिती नसल्याचे चित्र आहे.
पहिली ते चौथीचे विद्यार्थी खेळण्यात मग्न आहेत. लहान मुले शाळेला विसरली आहेत. मुले टीव्ही , मोबाईलच्या आहारी जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पालक चिंता व्यक्त करत आहेत. संपूर्ण वर्ष वाया गेले असल्याचे मत काही पनवेलमधील काही पालकांनी व्यक्त केले आहे.
मुले घरी राहून कंटाळली तर आहेतच पण मोबाईल , टीव्हीच्या आहारी जास्त प्रमाणात गेली आहेत. अभ्यास नकोसा झाला आहे. कोरोना मुळे वर्ष तर वाया गेलेच आहे. पण अशी परिस्थिती कायम राहिली तर एक दिवस विद्यार्थी नक्कीच शाळेला विसरतील. -नोहर चव्हाण , पालक
शाळा बंद झाल्यानंतर काही दिवस मुले अभ्यासात रमली , ऑनलाईन शिकवणी सुरु होती आणि आजही सुरु आहे. पाचवीच्या शाळा सुरु झाल्या पण लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या नाहीत. आता तर लहान मुले अभ्यासासाठी कंटाळा करत आहे. वारंवार पुस्तक घे असे सांगावे लागते. पण त्यात त्यांचे मन रमत नाही. -शेखर गव्हाळे , पालक