कर्जत : पावसाळ्यात कर्जत आणि खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात. मात्र, अनेक जण मद्य पिऊन पाण्यात उतरतात. काहींना पोहता येत नाही. त्यामुळे बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्थादेखील धोक्यात येते. त्यामुळे धबधबा, धरण क्षेत्रात एक कि.मी. परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून या ठिकाणी पोहायला, फिरायला गेलात तर पोलीस कस्टडीत बसायची वेळ तुमच्यावर येऊ शकते.कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण, पाली भूतिवली धरण, सोलनपाडा धरण - पाझर तलाव, कोंढाणे धरण-धबधबा, पाषाणे तलाव, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, बेकरे धबधबा, आषाणे-कोषाणे धबधबा या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोणालाही पर्यटनासाठी जाता येणार नाही. खालापूर तालुक्यातील धामणी कातकरवाडी धरण, कलोते धरण, डोणवत धरण, माडप धबधबा, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, वावर्ले धरण, झेनिथ धबधबा परिसर, नढाळ धरण, आडोशी धबधबा, मोरबे धरण, आडोशी पाझर तलाव, झेनिथ धबधबा या गजबजलेल्या पर्यटनस्थळांचा समावेश आहे.धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, धोकादायक वळणांवर सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण फोटोग्राफी करणे, पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली जाण्यास बंदी राहणार आहे. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा होईल, अशा प्रकारे वाहन चालविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.प्रतिबंधात्मक आदेशधबधब्याच्या एका कि.मी. परिसरात सर्व दुचाकी, चार चाकी व सहा चाकी वाहनांना २२ आॅगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली आहे.
coronavirus: कर्जत, खालापूरमधील पर्यटनस्थळांवर बंदी, सुरक्षिततेच्या उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 11:28 PM