Coronavirus : रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 02:35 AM2020-03-17T02:35:39+5:302020-03-17T02:36:19+5:30
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी परराज्यातून तसेच अन्य भागातून येणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली असून नेहमीच पर्यटकांनी गजबजलेली ठिकाणे व धार्मिक स्थळे सुनीसुनी झाली आहेत. शासनाचा आदेश येईपर्यंत ही पर्यटनस्थळे बंद असणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना शासन आणि प्रशासनाकडून घेतल्या जात आहेत.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी परराज्यातून तसेच अन्य भागातून येणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंग, बनाना राइड, किल्ला होडी प्रवासी वाहतूक, घोडा राइड, उंट सफारी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अलिबाग समुद्रकिनारी सोमवारी सकाळपासूनच शुकशुकाट होता. तसेच किनाºयावर पोलिसांची गस्त सुरू आहे.
काशीद समुद्रकिनारा प्री-वेडिंग शूटसाठी नेहमीच गजबजलेला असतो. मात्र आता १५ मार्च २०२० पासून शासनाचा आदेश येईपर्यंत काशिद समुद्रकिनाºयावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच परराज्यातून आलेल्या पर्यटकांची स्थानिक पातळीवर चौकशी करीत तत्काळ उपाययोजनाही करण्यात येत आहेत.
मुरूड तालुक्यात जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दररोज देश-विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र आता पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच एखाद्या खानावळीमध्ये किंवा हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या पर्यटकाला सॅनिटायझरने हात धुण्यास सांगितले जात आहे. कॅश काउंटरवर बसलेली व्यक्ती सॅनिटायझर हातावर देत हॉटेलमध्ये प्रवेश देत आहेत.
मुरूड बीचवर शुकशुकाट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुरूड बीचवर शुकशुकाट होता, तर बाजारपेठेत तुरळक प्रमाणात गर्दी दिसून आली.
कोर्लई, बोर्ली-मांडला, काशिद बीच, काशिद तसेच नांदगाव-मजगावमध्ये विविध स्टॉल्सवर परिणाम झाला तर बाजारपेठेतील काही ठिकाणी दुकाने बंद होती.
शहर तसेच ग्रामीण भाग सुरक्षित असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनस्तरावर नगरपालिका प्रशासन, रुग्णालयामार्फत खबरदारी घेण्यात येऊन उपाययोजना करण्यात येत आहेत.
स्थानिक व्यावसायिक अडचणीत
कोरोनोच्या सावटाखाली सध्या पर्यटन व्यवसाय अडकल्याने येथील स्थानिक व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह हा पर्यटनावर अधारित आहे. मात्र शासनाचा आदेश येईपर्यंत आता या व्यावसायिकांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
मुरूड तालुक्यातील काशिद बीच बंद
1बोर्ली-मांडला : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने गंभीर पावले उचलली आहेत. पर्यटनात प्रसिद्ध असलेल्या मुरूड तालुक्यातील काशिद बीचवरील विविध स्टॉल्स जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काशिद ग्रामपंचायत, स्टॉल्सधारक व ग्रामस्थांच्या वतीने बंद ठेवण्यात आले आहेत.
2राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
3गेल्या अनेक दिवसांपासून या बीचवर तुरळक प्रमाणात गर्दी दिसून आली तर सोमवारी कोरोना पार्श्वभूमीवर स्टॉल्स बंद ठेवण्यात आल्याने शुकशुकाट होता. याबाबत ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार स्थानिक छोट्या-मोठ्या व्यवसायधारकांना बंद ठेवण्याची दवंडी करून सूचना देण्यात आली आहे.
देवस्थानांवर ‘कोरोना इफेक्ट’
गर्दीच्या ठिकाणी तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानांमध्येदेखील स्वच्छतेबाबत काळजी घेतली जात आहे.
पाली, महड आणि हरिहरेश्वर मंदिर प्रशासनाने स्वच्छता वाढवण्यावर भर दिला आहे. कोणत्याही ठिकाणी आजारी रु ग्ण आढळल्यास तत्काळ त्याच्यावर उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भक्तांना दर्शनासाठी मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत.
अष्टविनायक क्षेत्र महड आणि श्री क्षेत्र पाली या ठिकाणी रोज हाजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे परराज्यातून येणाºया भाविकांकडून स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे.
किल्ले प्रबळ माचीवर जाण्यास बंदी
पनवेल : कोविड १९ या विषाणूचा संसर्ग वाढू नये, म्हणून माची प्रबळ गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत येथे जाण्यास संयुक्त वन व्यवस्थापन समितीने बंदी घातली आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ट्रेकिंग, कॅम्पिंगसाठीची उत्तम जागा म्हणजे प्रबळ माची. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. मुंबई-पुण्यातील ट्रेकर्सचे आवडते ठिकाण म्हणजे प्रबळगड - कलावंतीण दुर्ग. दोन्ही दुर्ग पनवेल-माथेरानच्या मध्यभागी वसले आहेत.
सद्य:स्थितीत कोरोनाच्या संसर्गामुळे संयुक्त वन व्यवस्थापन समितीने सुरक्षेच्या कारणास्तव ३१ मार्चपर्यंत पर्यटकांना या ठिकाणी प्रवेश न देण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी पर्यटनस्थळांवर बंदी घातली आहे.
कर्नाळा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद
पनवेल : कर्नाळा अभयारण्य १७ ते ३१ मार्चपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती दिली. पनवेलजवळील या अभयारण्यात वर्षभर मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरातून पर्यटक येत असतात. विशेष म्हणजे येथील वनराई व विदेशी पक्षी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असतात. मात्र कोरोनाचा फैलाव थांबविण्याच्या दृष्टीने वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना प्रवेश बंद असल्याचा फलक येथे लावण्यात आला आहे.
दिवेआगरमधील पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय
बोर्ली पंचतन : कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. महाराष्ट्रामध्येदेखील याचा प्रसार झपाट्याने होत असून महाराष्ट्र शासनापासून भारत देश सध्या अलर्ट झाला आहे. महाराष्ट्र शासनाने बरीचशी सार्वजनिक ठिकाणे सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंद केली असून शाळांनादेखील सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळ असणारे श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे पर्यटन व्यवसाय ३१ मार्चपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय सोमवारी दिवेआगर येथे ग्रामपंचायत सभागृहामध्ये झालेल्या ग्रामस्थांच्या विशेष सभेमध्ये घेण्यात आला. तर दिवेआगर येथील होणारी सिद्धनाथ भैरव व केदारलिंग या यात्रादेखील रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे नेहमी गजबजलेले पर्यटनस्थळ आहे. दररोज शेकडो पर्यटक दिवेआगर व परिसराला भेट देत असतात. सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूने भारतामध्ये शिरकाव केला आहे. यामुळे कोरोना या विषाणूची लागण पसरू नये यासाठी विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने दिवेआगर येथील ग्रामपंचायतीनेदेखील मोठा निर्णय घेतला आहे. दिवेआगर येथे पुणे, मुंबई व अन्य शहरांतून पर्यटक येत असतात. यासाठी सोमवारी ग्रामपंचायत सभागृहामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखी ठराव करीत ३१ मार्चपर्यंत दिवेआगर गावामध्ये पर्यटन व्यवसाय पूर्णपणे स्थगित करण्यात येत असल्याचे ठरविले. यामध्ये कोणत्याही प्रकारे राहण्याचा तसेच बाहेरील फेरीवाले यांनादेखील गावामध्ये फिरण्यास मज्जाव करण्याचा ठरावही करण्यात आला आहे. या ग्रामसभेसाठी सरपंच उदय बापट, उपसरपंच समीक्षा पिळणकर, सदस्य गीता वाणी, सुहास मार्कंडे, राकेश केळसकर, ग्रामसेवक शंकर मयेकर, माजी सभापती लाला जोशी, माजी उपसरपंच संजय पाटील, किसन तोडणकर, प्रमोद तोडणकर, देवेंद्र नार्वेकर, पर्यटन संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
सिद्धनाथ व केदारलिंग यात्रा रद्द
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील भक्तांचे आदरस्थान असलेली सिद्धनाथ व केदारलिंग यात्रा ६ व ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार होती; परंतु सोमवारी सायंकाळी सिद्धनाथ व केदारलिंग यात्रा कमिटीच्या विश्वस्त, कार्यकारी व सहकारी मंडळाची संयुक्त सभा घेण्यात आली.
यामध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार होऊ नये व ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सिद्धनाथ व केदारलिंग यात्रा रद्द करण्याचा निर्णय सभेमध्ये घेतला आहे. भाविक व व्यावसायिकांनी यात्रा रद्द झाल्याची नोंद घ्यावी व दिवेआगर येथे येऊ नये, असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष अश्विन गन्द्रे यांनी केले आहे.