coronavirus: माथेरानचे पर्यटन सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था, रुग्ण वाढल्याने चिंता, स्थानिकांमध्ये द्विधा मनस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 12:48 AM2020-09-03T00:48:18+5:302020-09-03T00:49:05+5:30
गावातील सर्वच नागरिकांना व्यवसायाचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशानेच काही मंडळे, संस्था आणि काही पक्षांची राजकीय मंडळी माथेरानचे पर्यटन सुरू करावे, यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत.
माथेरान : माथेरानमधील बहुतांशी लोकांचे जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असते, परंतु कोरोनासारखे संकट कोसळल्याने इथे १८ मार्चपासून पूर्णत: लॉकडाऊन करून पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. लॉकडाऊनला पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे, परंतु आजतागायत जनजीवन सुरळीत होऊ शकलेले नाही.
इथले सर्व व्यवहार हे पावसाळ्यात पूर्णत: बंद असायचे. घोडे चार महिने पावसाळ्यात आपापल्या तबेल्यातच आराम करीत असत. तेव्हा घोडेही गुटगुटीत राहत होते, परंतु या कोरोनाच्या लॉकडाऊनमधील कार्यकाळात घोडे एकाच जागेवर तबेल्यात बांधले जात असल्याने आजारी पडत आहेत. गावातील सर्वच नागरिकांना व्यवसायाचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशानेच काही मंडळे, संस्था आणि काही पक्षांची राजकीय मंडळी माथेरानचे पर्यटन सुरू करावे, यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत. पाच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पर्यटकांना प्रवेश देण्यात आला, तर आणखीन रुग्ण वाढू शकतात.
मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचे पर्यटनस्थळ असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांनाच आपापले व्यवसाय मनात भीती ठेवूनच करावे लागणार आहेत. त्यातूनही इथल्या सर्वसामान्य लोकांच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून इथे पर्यटन सुरू व्हावे, ही भूमिका जरी व्यावसायिकांच्या हिताच्या बाबतीत सकारात्मक आणि योग्य असली, तरीही या लहानशा गावात कोरोना रुग्ण वाढत गेल्यास, त्यासाठी प्रशासनाला खूपच त्रासदायक ठरू शकते. सर्वसामान्य लोकांना पुढील अवाजवी वैद्यकीय खर्च हे न परवडणारे आहेत. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच द्विधा मनस्थिती इथल्या स्थानिकांची झाली आहे.
आजवर माथेरानमध्ये कोरोना रुग्णांचे शून्य प्रमाण होते, पण गेल्या काही दिवसांत २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हा आकडा पुढे-पुढे वाढत आहेत, त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व नागरिक हे नेहमीच काहींना काही कारणास्तव एकमेकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांची तपासणी केल्यास मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही साखळी तोडण्यासाठी, नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याबाबत वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून नगराध्यक्षा प्रेरणा सावंत सूचना, माहिती देत आहेत.
राज्य सरकारने ई-पास रद्द केला आहे व हॉटेल्स व लॉजेसना सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने, माथेरानचे पर्यटन योग्य ती काळजी घेत सुरू झाले पाहिजे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून खेडेगावापासून मुंबई-पुणे शहरातील व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहेत. कोरोनासोबत जगायचे ठरवल्याने व्यवसायही सुरू करावे लागतील.
- सुनील शिंदे,
सामाजिक कार्यकर्ते माथेरान
माथेरान पर्यटकांसाठी आता सुरू केले तर कमी प्रमाणात पर्यटक येतील. विविध नियम, संकेत पाळणे सोपे जाईल व या नवीन पद्धतीने वागण्याचा सराव होईल. ज्या गोष्टींची काळजी घ्यायचीय, त्यांची सवय होईल. घोडे, रिक्षा, कुली, स्टॉल्स, हॉटेल इत्यादी व्यवसाय सुरू होतील. सर्वांचे उत्पन्न सुरू होईल, ते आवश्यक आहे.
- मनोज खेडकर,
माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रीय काँग्रेस शहर अध्यक्ष माथेरान
जिल्हाधिकाऱ्यांनी मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार, आजपर्यंत माथेरान लॉकडाऊन आहे. माथेरानमधील नागरिकांना व्यवसाय उपलब्ध व्हावा, यासाठी लवकरच माथेरान पर्यटकांसाठी खुले करावे, याबाबत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी वरिष्ठांना ६ जुलै रोजी निवेदन सादर केले आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी घेतली, तर पर्यटकांना प्रवेश देण्यास हरकत नाही. १० ते १५ सप्टेंबरमध्ये माथेरान सुरू करण्याचा आमचा मानस आहे.
- प्रसाद सावंत, गटनेते माथेरान नगरपरिषद