coronavirus: कोरोनामुळे मुरुड तालुक्यातील गणेशमूर्ती शाळांवर परिणाम, कु शल कामगार मिळण्यात अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:36 AM2020-07-08T00:36:09+5:302020-07-08T00:37:04+5:30
यंदा कोरोना महारोगाच्या संकटामुळे गणेशमूर्तीला मागणी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे गणेशमूर्ती शाळांवर परिणाम झालेला दिसत आहे.
- गणेश चोडणेकर
अगरदांडा : आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे मुरुडमधील गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य आहे. मात्र, यंदा कोरोना महारोगाच्या संकटामुळे गणेशमूर्तीला मागणी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे गणेशमूर्ती शाळांवर परिणाम झालेला दिसत आहे.
मुरुडच्या गणपतीमूर्तींना केवळ पंचक्रोशीतील भागातच मागणी नसून तालुक्याच्या बाहेरही मागणी वाढत आहे. मुरुड शहराला गणेशमूर्ती व्यवसायाच्या बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वी मुरुड शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात पसरण्यास सुरुवात झाली आहे.
शाडूच्या गणेशमूर्तीसाठी मुरुड शहर प्रसिद्ध आहे. येथील कारखान्यात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनवत नाहीत. त्याने प्रदूषण होते. त्यामुळे मूर्तिकारांचा शाडूच्या मातीत मूर्ती बनविण्याकडे जास्त कल असल्याचे मूर्तिकार अच्युत चव्हाण सांगत आहेत. मुरुड शहरात पंधरा कारखाने आहेत.
पंचक्रोशीतील परिसरांतही गणेशमूर्ती बनविणारे लहान-मोठे कारखाने सुरू झाले आहेत. अलीकडच्या काळात गणेश मूर्तिकारांना आणखी एक समस्या भेडसावते आहे. सुबक मूर्ती घडविणारे आणि रंगकाम झाल्यानंतर आणखी सुबक काम करणारे कुशल कामगार मिळेनासे झाले आहेत. गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
गणपती उत्सव जवळ आला की, कारखान्यात लोकांना रोजगार मिळतो. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे चांगला नफा मिळत असतो. गणेशभक्तांचा कल आणि मागणी लक्षात घेऊन दरवर्षी नवीन प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. गणेशमूर्ती बनविण्याचा कच्च्या मालाच्या किमती आणि कामगारांच्या मजुरी वाढल्या असल्या, तरी गणेशमूर्तींच्या किमतीत यंदा वाढ केलेली नाही.
आधीच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, नागरिक त्रस्त असल्याने मुंबईकर असो, या इतर शहरांतील नागरिक, सर्वांनी शहरांकडे पाठ फिरविल्याने मूर्ती ५० ते ६० नगांनी कमी झाल्या आहेत, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यात गणेशमूर्तीची उंचीही कमी करण्यात आली आहे.
या वर्षी निसर्ग चक्रीवादळाचे मोठे संकट मुरुड तालुक्यात आले. त्यातून सावरण्याचा प्रयत्न प्रशासन करत असले, तरी आर्थिक परिस्थितीला नागरिकांनाच तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करून गणेशमूर्तीत वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- अच्युत चव्हाण, मूर्तिकार