रोहा : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी ८ तर रविवारी पुन्हा तालुक्यात १० रुग्णांचे नमुने कोरोनाचे पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. दोन रुग्णांचे मृत्यू झाले असून, मृत्युपश्चात त्यांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या आता १७८ वर पोहोचली आहे.नेहरूनगर, रोहा येथील ७६ वर्षीय व्यक्ती आणि सुरभी बिल्डिंग वरसे येथील ५९ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्युपश्चात स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने हे दोघे कोरोनाचे बळी ठरले आहेत. १८ नव्या बाधितांमध्ये नऊ महिलांचा समावेश असून, यामध्ये ७ रोहा शहर, ६ वरसे, नागोठणे व पुगाव प्रत्येकी एक तर सुदर्शननगर रोठ येथील दोन रुग्ण आहेत. दरम्यान, रोहा तालुक्यातील १७८ कोरोनाबाधितांपैकी ५८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत ११८ रुग्णांवर पुढील औषधोपचार सुरू असल्याची माहिती रोहा तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.सुधागड तालुक्यात २० जण क्वारंटाइन , एकास लागणपाली : सुधागड तालुक्यात परळी येथील एका ३४ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून त्याच्या संपर्कातील दोन डॉक्टरसह २० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर रुग्णावर वावळोली येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. खबरदारी म्हणून परळी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.तालुक्यात कोरोना बधितांची संख्या दिवसागणिक वाढतांना दिसत आहे. तालुक्यात कोरोनाबधितांची संख्या आता सहा झाली आहे. मात्र पालीतील आणखी एक तरुण कोरोनाबाधित आहे. मात्र त्याने खोपोली येथील पत्ता दिल्याने त्याची नोंदणी खालापूर तालुक्यात झाली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितले. सध्या या रुग्णांवर देखील वावळोली येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असून त्याच्या कुटुंबियांसह संपकातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले.प्रशासन कोरोनाच्या संदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी तालुक्यातील जनतेला केले. तर सुधागड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितले की, नागरिकांनी सावधान राहावे, घाबरून जाऊ नये पण नियम पाळून काळजी घेणेगरजेचे आहे.
coronavirus: रोह्यात दोघे मृत्युपश्चात कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 1:10 AM