Coronavirus: पनवेलमध्ये कोरोनाबाधित मृतदेह सात तास घरातच पडून; पालिकेचा भोंगळ कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:48 AM2020-06-28T00:48:17+5:302020-06-28T00:48:35+5:30
शववाहिनीला येण्यास उशीर; पालिका अधिकाऱ्यांचा बेजबाबदार कारभार उघड
वैभव गायकर
पनवेल : पनवेलच्या खांदा कॉलनी सेक्टर ९ मधील ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा शुक्रवारी रात्री ९च्या सुमारास घरातच कोविडने मृत्यू झाला. संबंधित रुग्णाची पालिकेच्या डॉक्टरांनी पाहणी केली. रुग्णाला मृत घोषित केले. मात्र, पालिकेची शववाहिनी तब्बल सात तासांनंतर मृतदेह घेण्यासाठी आली. त्यांचा मृत्यू झाल्यावर २३ तासांनी शनिवारी संध्याकाळी उशीरा त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात आले.
पालिका प्रशासनाच्या अनियंत्रित कारभाराचा फटका मृत झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबीयांना बसला. संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी पालिकेचे काँटॅक्ट ट्रेसिंगचे अधिकारी बाबासाहेब चिमणे यांना माहिती दिली. त्यांनी त्वरित डॉक्टर मिलिंद घरत यांना ही माहिती दिल्यानंतर घरत यांनी रात्री १०च्या सुमारास रुग्णाच्या घरी येऊन तपासणी केल्यानंतर रुग्णाला मृत घोषित केले. तासाभरात शववाहिनी येऊन मृतदेहाला घेऊन जाईल, असे त्यांनी सांगितले. यानंतर घरत यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील नखाते यांना संबंधित रुग्णाची माहिती दिली. यानंतर घरत यांनी डॉ.नखाते यांच्याशी समन्वय साधण्याच्या सूचना मृताच्या कुटुंबीयांना दिल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील नखाते यांच्याशी मृताच्या नातेवाइकांनी रात्री १२च्या सुमारास संपर्क साधला असता, शववाहिनी मृतदेह घेण्यासाठी निघाल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, तासाभराचा कालावधी लोटल्यानंतरही शववाहिनी आलीच नसल्याने नातेवाइकांनी पुन्हा नखातेंशी संपर्क साधला. यावेळी नखाते यांनी शववाहिनी रवाना झाली असल्याचे सांगत, डॉ.संतोष धोत्रे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. धोत्रे यांनी आम्हाला वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांना धक्काच बसला. चार तासांचा कालावधी लोटला, तरी नखाते यांच्याकडून संबंधित मृतदेह घरातून हलविण्यास चालढकल सुरूच होती.
या घटनेने पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे उघड झाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील नखाते यांनी संबंधित जबाबदारी सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांची असल्याचे सांगितले. पोशेट्टी यांच्याकडूनही काहीच दाद मिळाली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मध्यरात्री २.३०च्या सुमारास उपायुक्त जमीर लेंगरेकर व उपायुक्त संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधून ही घटना सांगितल्यावर प्रशासकीय पातळीवर या प्रकरणाला गती मिळाल्यावर पहाटे ४च्या सुमारास शववाहिनी संबंधित इमारतीमध्ये पोहोचली. दरम्यान, कोविडच्या कार्यकाळात एखाद्या सोसायटीमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कोणाशी संपर्क साधावा, याकरिता सर्व अत्यावश्यक क्रमांक या सोसायटीमध्ये देणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत कटू अनुभव खांदा कॉलनीमधील या गृहनिर्माण सोसायटीला आला आहे.
मृताच्या कुटुंबीयांसाठी काळरात्र
सहा सदस्यांच्या या कुटुंबीयांत मृत व्यक्तीच्या बाधित मुलाला या आधी उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यानंतर, कुटुंबातील इतर पाच सदस्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. ८४ वर्षीय आजोबांची तब्येत बिघडल्याने संबंधित कुटुंब हतबल झाले. पालिकेशी संपर्क साधूनही मृतदेह घेण्यासाठी कोणीच येत नसल्याने, संपूर्ण रात्र कुटुंबीयांना मृतदेहासोबत जागूनच काढावी लागली.
अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका
पनवेल महानगरपालिकेत सध्याच्या घडीला अपुºया मनुष्यबळावर पालिकेचा कारभार सुरू आहे. २०००पेक्षा जास्त जागांचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. अशा परिस्थितीत केवळ सहाशे ते सातशे कर्मचाºयांवर पालिकेचा गाडा हाकला जात असताना, काही कामचुकार कर्मचारी वर्गामुळे संपूर्ण पनवेल महानगरपालिकेची बदनामी होत आहे.
पालिका आयुक्तांनी घेतली गंभीर दखल
संबंधित घटनेची गंभीर दखल पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतली. त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील नखाते यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित घटनेत दोषी अधिकाºयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
पालिकेच्या प्रभारी स्वच्छता निरीक्षकाचा उद्धटपणा
1) पालिकेचे प्रभारी स्वच्छता निरीक्षक अभिजित भवर हे मृतदेहाचे विल्हेवाट लावण्याचे काम पाहतात. शववाहिनी उपलब्ध करण्याचे काम भवरच करतात.
2) एमजीएम रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांना दोन तास थांबवून भवर उद्धटपणे वर्तन करत होते.
3) अंत्यविधीला नेमका किती वेळ लागेल याबाबत विचारणा केल्यास चालढकलपणाची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईची गरज आहे.