निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोनाने गेल्या नऊ महिन्यांत कहर केला होता. रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या नऊ महिन्यांत रायगड जिल्ह्यात ५१ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. यामधून ४७ हजार ३२९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढत आलेख लक्षात घेऊन जिल्ह्यात ४५ ठिकाणी उपचार यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या कोविड सेंटरमधून ५ हजार १४४ बेड तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ऑक्सिजन सपोर्टेड बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर्स सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून ३,८३७ कोविड सेंटर आहेत. यामध्ये १६८ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के कोरोना पॅझिटिव्ह रुग्ण येत असले, तरी कोरोनापासून मुक्त होणाऱ्या या रुग्णांचे प्रमाण ९२ टक्के आहे.
५ मार्चपासून आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५१ हजार ४१५ रुग्णांची संख्या पार केली आहे. कोरोनामुळे रायगड जिल्ह्यात १,४५५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या रुग्णांची संख्या २ हजार ६३१ आहे. या व्यक्तींना अधिक उपचारासाठी आणि देखरेखीसाठी जिल्ह्यात ४५ कोविड सेंटर उभारले आहेत. यामध्ये कोविड केअर सेंटर १८, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर २५, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल २ आहेत. रुग्णालयांमध्ये ५ हजार १४४ बेड्सची निर्मिती करण्यात आली आहे. या बेड्समध्ये ऑक्सिजन सपोर्टेड १,१९१ आणि आयसीयू बेड ३१३ आहेत. या सर्व कोविड सेंटरमध्ये ६४ व्हेंटिलेटर्स सज्ज आहेत. बाधित किंवा संशयित असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी आणणे आणि त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईत नेणे, यासाठी १०३ रुग्णवाहिका सज्ज आहेत.
स्वत:च्या आरोग्याविषयी आता नागरीकही सजग झाले आहेत. सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला नागरिकांतून प्रतिसाद मिळत आहे. आमचे कर्मचारी गावागावांमध्ये जाऊन नागरिकांची माहीती घेत आहेत. कुणा नागरिकास सर्दी, ताप, खोकला असेल, तर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. - सुहास माने, जिल्हा शल्य चिकीत्सक