coronavirus: माथेरानमध्ये कोरोनाचा कहर, एका दिवसात १५ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 01:30 AM2020-09-01T01:30:38+5:302020-09-01T01:30:59+5:30
गणेशोत्सव काळात एका दिवसात १५ नवीन रुग्ण वाढल्याने माथेरानच्या नागरिकांमध्ये भीतीच वातावरण असून, माथेरान प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कर्जत : माथेरानमध्ये कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर एक ही रुग्ण नव्हता. मात्र, गणेशोत्सव काळात एका दिवसात १५ नवीन रुग्ण वाढल्याने माथेरानच्या नागरिकांमध्ये भीतीच वातावरण असून, माथेरान प्रशासनाची चिंता वाढली आहे. तालुक्यातील आजच्या एकूण २० नवीन रुग्णांपैकी १५ रुग्ण माथेरान शहरातील आहेत. कर्जत शहर आणि नेरळ गावात सोमवारी कमी रुग्ण आढळून आले आहेत.
कर्जत तालुक्यात आतपर्यंत ८६४ पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून, त्यात ४१ मृत झाले असून, ७१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारच्या नवीन रुग्णांमध्ये एकट्या माथेरानमध्ये १५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील चौदा रुग्ण हे इंदिरा गांधीनगर या भागातील असून, ६ ते ६० वयोगटांतील हे रुग्ण एकाच परिवारातील आहेत. त्यात एक सहा महिन्यांचे लहान मूलही आहे, तसेच यातील एक महिला माथेरान नगरपरिषदेत कामाला असल्याने महिला कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्याने नगरपालिका बंद ठेवण्यात आली होती. एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरातील पंचशीलनगर येथील असून, ती व्यक्ती भाजीचा व्यवसाय करीत होता. एक रुग्ण हा छत्रपती शिवाजी महाराजनगरमधील आहे. या सर्वांची अँटिजेन चाचणी केली असता, ते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, असे येथील आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत यादव यांनी सांगितले आहे.
माथेरानमधील हे रुग्ण व्यवसाय करताना कोणाकोणाला भेटले आहेत, त्यांचा शोध सुरू असून, त्या सर्वांच्याही चाचण्या केल्या जाणार असल्याचे सांगितले.
पाच जणांना बाधा
कर्जतमधील मुद्रे बुद्रुक परिसरात राहणारी ३५ वर्षांच्या महिलेचा, कर्जत बाजारपेठेमध्ये राहणाऱ्या एका ६१ वर्षांच्या व्यक्तीचा, आमराईमध्ये एका ३३ वर्षांच्या तरुणाचा, आवळस येथील एका ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह
आला आहे. नेरळ येथील एका ६८ वर्षांच्या व्यक्तीलाही कोरोनाची बाधा झाली आहे.