coronavirus: कोरोनाचा फैलाव थांबता थांबेना, राज्यातील या जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 03:26 PM2020-07-13T15:26:08+5:302020-07-13T15:58:36+5:30
शहरी भागांसोबत ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याने शासन आणि प्रशासनासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे.
अलिबाग - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावाने सध्या राज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये आणि जिल्ह्यांत गंभीर रूप धारण केले आहे. दरम्यान मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढतच असून, मुंबईलगत असलेल्या रायगड जिल्ह्यातली कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरी भागांसोबत ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याने शासन आणि प्रशासनासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रायगड जिल्ह्यात १५ ते २४ जुलैदरम्यान १० दिवस लॉकडाऊन लागू राहणार आहे. या दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये रायगड जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे सात हजार ५५१ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी चार हजार २९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ हजार २६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत जिल्ह्यात २१२ जणांचा मृ्त्यू झाला आहे.