coronavirus: करंजा येथे रुग्णांची कोविड चाचणी बंद, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 02:47 AM2020-05-16T02:47:10+5:302020-05-16T02:47:27+5:30
लागोपाठ चार दिवसांत रुग्ण संख्येने शंभरी गाठल्याने करंजा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. जिल्हाधिकाºयांनी उरण रेड झोनमध्ये आल्याचे जाहीर केले.
उरण : तालुक्यातील करंजा परिसरात कोरोनाच्या प्रकोपामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. असे असताना गेल्या पाच दिवसांपासून करंजा येथील रुग्णांची कोविड- १९ ची चाचणी बंद करण्यात आल्याचे समोर आहे आहे. शासनाने क्वारंटाइन सेंटरची व्यवस्था करून टेस्टची सुविधा सुरू करावी, अशी मागणी रायगड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मार्तड नाखवा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीतून केली आहे.
उरण तालुक्यात करंजा गावातील सातपाड्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. २० ते २२ दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. ५ मे रोजी एका संशयित रुग्णांची पहिली टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर तीन टप्प्यांत सुमारे १३८ संशयित रुग्णांची कोविड टेस्टमध्ये सलग चार दिवसांत ९६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
लागोपाठ चार दिवसांत रुग्ण संख्येने शंभरी गाठल्याने करंजा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. जिल्हाधिकाºयांनी उरण रेड झोनमध्ये आल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही शासकीय वरिष्ठ अधिकाºयांनी कोरोना टेस्ट करणेच बंद केले आहे. त्यामुळे परिसरातील १३८ गोरगरीब रुग्णांनी स्वखर्चाने कोविडची टेस्ट केली. केवळ पैशाअभावी अनेक संशयित रुग्ण कोविड-१९ची टेस्ट करू शकले नाहीत. तर काहींनी पैसे उधारीवर घेऊन कोविड टेस्ट करण्याच्या तयारीला लागले आहेत.
कोविड-१९ टेस्टच्या सुविधा तत्काळ सुरू करण्यात याव्यात, अशी मागणीही नाखवा यांनी केली आहे. या गंभीर प्रकरणी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मात्र, नाखवा यांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी माहिती देताना सांगितले.
कोविड टेस्ट बंद केलेल्या नसल्याचे सांगत गुरुवारी ६० संशयित रुग्णांचे स्वॅब रिपोर्ट तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संशयित रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी सोयीसुविधा असलेल्या उरण परिसरातीलच काही खासगी इमारती अधिग्रहण करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहितीही नवले यांनी दिली.