अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाच महिन्यांत कोरोना संसर्गाच्या उंचविणाऱ्या आलेखावरून ही बाब स्पष्ट होत आहे. दररोज शंभरी पार करणाºया रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून, पाच महिन्यांत कोरोना रुग्णांनी १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
पनवेल महापलिका क्षेत्रात पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा या परिसरात मंगळवारपर्यंत १० हजार ५८१ कोरोना संसर्गाची लागण झाली आहे, तर २६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जून आणि जूलै महिन्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णाचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, तसेच वारंवार नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. पनवेल पालिका क्षेत्रात इंडिया बुल्स, कळंबोली येथील देवांशी इन, पनवेल उपजिल्हा रुग्णालय, कामोठे येथील एमजीएम रुग्णालयासोबतच १६ खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. कामोठा परिसर हॉटस्पॉट ठरला आहे. मंगळवारपर्यंत २ हजार २५४ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर, खारघर येथे २ हजार १२२ रुग्ण सापडले आहेत, तर नवीन पनवेल १ हजार ९५३ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर, कळंबोली, पनवेल आणि सर्वात कमी रुग्ण म्हणजे ५८९ जणांना तळोजा परिसरात कोरोनाचा संसर्ग झाला आहे.