Coronavirus: रायगड जिल्ह्यात खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 12:40 AM2020-05-05T00:40:11+5:302020-05-05T00:40:23+5:30
प्रशासनाच्या प्रसिद्धी पत्रकापूर्वीच दुकाने खुली, पोलिसांची झाली तारांबळ
निखिल म्हात्रे
अलिबाग : रायगड जिल्ह्यात संचारबंदी शिथिल करण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रक जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्रीपर्यंत जाहीर केले नव्हते. कोणती दुकाने सुरू राहणार वा बंद राहणार ते स्पष्ट केले नसल्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या प्रसिद्धी पत्रकापूर्वीच सोमवारी सकाळी रायगड जिल्ह्यातील काही दुकानदारांनी आपली दुकाने खुली केली होती. तर दुसरीकडे बंद असलेल्या वाइन शॉपसमोर नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे सोशल डिस्टन्सचे रायगड जिल्ह्यात तीनतेरा वाजले. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी वेळीच धाव घेऊन दुकान बंद करीत गर्दी कमी केली.
रायगड जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आल्यावर संचारबंदीमधील काही अटी व शर्ती काही प्रमाणात शिथिल होतील, अशी अशा नागरिकांना होती. मात्र, जिल्हा एमएमआरमध्ये येत असल्याने पूर्वीप्रमाणेच संचारबंदी, लॉकडाउन कायम राहणार आहे. याची कल्पना जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळपर्यंत नागरिकांना दिली नसल्यामुळे नागरिकांनी रायगड जिल्ह्यातील संचारबंदीच्या अटी शिथिल केल्या असल्याचे समजून घराबाहेर पडण्यास सुरुवात केली होती. नेहमी ओस पडलेल्या रस्त्यांवर सोमवारी सकाळपासूनच वाहनांची रेलचेल सुरू होती.
सोमवारी सकाळपासूनच नागरिकांची पावले बाजारपेठांकडे वळली होती. जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरी भागात मोठ्या प्रमाणावर
गर्दी केली होती. एक वस्तू खरेदी करण्यासाठी कुटुंबातील दोन व्यक्ती घराबाहेर पडल्याचे या वेळी दिसून आले. एकाच वेळी नागरिकांनी गर्दी केल्याने पोलिसांना गर्दी हटविणे जिकिरीचे झाले होते. मात्र योग्य प्रकारे पोलिसांनी परिस्थिती हताळली.
निर्र्बंधासह संचारबंदी काही ठिकाणी शिथिल
ज्या वाहनांना व व्यक्तींना वाहतुकीची परवानगी मिळाली आहे, त्यांना वाहतुकीस परवानगी राहणार आहे. चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालक व दोन प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी आहे. दुकाचीवरून एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. शहरी भागातील औद्योगिक संस्था, मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर रिजन) महानगर पालिका क्षेत्र (पनवेल महानगरपालिकेचे क्षेत्र) वगळून विशेष अर्थिक क्षेत्र (सेझ) निर्यातक्षम केंद्र, औद्योगिक वसाहत व औद्योगिक शहरे काही निर्र्बंधासह सुरू राहणार आहेत. रायगड जिल्ह्यातील परमिट रुम, सोशल क्लब, आॅर्केेस्ट्रा, मनोरंजनाची ठिकाणे, सलुन, स्पा, ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. तर राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र यांनी दिलेल्या निर्देशानुसार मान्यताप्राप्त दुकानांमध्ये मद्य विक्री व बीयर शॉपीमध्ये बीयर विक्री सुरू राहणार आहे. तसेच दुकानासमोर मार्किंग करणे अवश्यक असून फक्त पाच माणसेच असणे अवश्यक आहे.