coronavirus: विद्यार्थ्यांविना शाळा पडल्या ओसाड, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालकांकडूनही सुरू करण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:45 AM2020-07-08T00:45:56+5:302020-07-08T00:46:34+5:30
राज्यात वाढत असलेला कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात पनवेल तालुक्यात कोरोना संसर्ग रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील शाळा अद्याप बंद आहेत.
कळंबोली - शाळेसाठी विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक आहे. या कोरोना महामारीमुळे शाळा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांविना शाळा ओसाड दिसू लागल्या आहेत. दरवर्षी शाळा सुरू झाल्या की, शाळा आणि विद्यार्थी हे आजपर्यंतचे समीकरण होते, परंतु यंदा कोरोनामुळे शाळा सुरू करण्यास शासनाची द्विधावस्था निर्माण झाली आहे, तर पालकांनीही या परिस्थितीत पाल्यास शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे.
दरवर्षी १५ जूनला नियमित शाळा सुरू व्हायची. शिक्षकांंकडून पहिलीसाठी विद्यार्थ्यांना शोधून शाळेत प्रवेश दिला जायचा. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन तयार राहत असत. विद्यार्थ्यांना नवीन गणवेश नवीन पुस्तके घेऊन शाळेत पहिले पाऊल टाकण्याचा आनंद वेगळाच असायचा. इतर वर्गातील विद्यार्थी परीक्षा देऊन पुढील वर्गात गेल्याने पहिल्या दिवशी आनंदी वातावरण निर्माण व्हायचे. मात्र, यंदा परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, खाऊ दिला जातो. त्यामुळे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी सणासारखा असतो.
मात्र, यंदा या सणावर कोरोनाने विरजण टाकले आहे. राज्यात वाढत असलेला कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात पनवेल तालुक्यात कोरोना संसर्ग रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील शाळा अद्याप बंद आहेत. शासनाचीही शाळा सुरू करण्याबाबत द्विधावस्था निर्माण झाली आहे. जुलैपासून शाळा सुरू होणार होत्या, परंतु कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून शाळा अद्याप तरी सुरू करणे जिकरीचे बनले आहे. त्यास पालकांनीही विरोध दर्शविला आहे.
ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर
कोरोनाच्या महामारीमुळे पनवेल महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील शाळा बंद आहेत. त्यामुळे पनवेल तालुक्यातील २४८ जिल्हा परिषद शाळांनी आॅनलाइन अभ्यासक्रम सुरुवात केली आहे.
शाळेतील वर्गशिक्षकाकडून व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जात आहे, तर पालकाकडे अँड्रॉइड मोबाइल नसेल, तर त्यांना फोनद्वारे अभ्यास दिला जात आहे.
यामुळे विद्यार्थी अभ्यासात रमत आहेत. शासनाकडून पुढील आदेश आल्यानंतर शाळा सुरू होणार असल्याचे मत गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले.