अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच रुग्णांची स्वॅब टेस्ट जिल्ह्यातच करता यावी, यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले असून, जिल्हा रुग्णालयात करोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळा अखेर मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना तत्काळ वैद्यकीय तपासणी अहवाल मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांना आपल्या अहवालाची वाट पाहात बसावे लागणार नाही.करोना रुग्ण स्वॅब तपासणीच्या संदर्भात रायगड जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी असून, आता रायगडकरांना स्वॅब तपासणी अहवालाकरिता प्रतीक्षेची गरज भासणार नाही. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातच आता कोरोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी संध्याकाळी झाला आहे. ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्ह्यातील विविध सार्वजनिक व खासगी उपक्रम यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या लॅबमुळे नागरिकांचे स्वॅब टेस्टिंग रिपोर्ट जिल्हा स्तरावरच वेळेत मिळण्यासाठी उपयोग होणार आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा रुग्णालय येथे ही लॅब मंजूर व्हावी, यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे नियमित पाठपुरावा केला होता. त्यास यश मिळाले असून, यामुळे रायगडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही लॅब मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले.कोरोनाबाधित रुग्णांचे स्वॅब टेस्टिंग रिपोर्ट जिल्हा स्तरावरच वेळेत मिळण्यासाठी जिल्ह्यातच प्रयोगशाळा उभारावी, अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यास मंजुरी मिळाली आहे. प्रयोगशाळा जिल्हा रुग्णालयातच उभारली जाणार असल्याने, आता रुग्णांचे कोरोनाच्या संदर्भातील अहवालही जलद गतीने मिळून संबंधित रुग्णावर वेळेत उपचार करणे सोपे होणार आहे. या दृष्टीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रयोगशाळेची मागणी केली होती, त्यास हिरवा कंदील मिळाला आहे.- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड
coronavirus: रायगडमध्ये जिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी प्रयोगशाळेला हिरवा कं दील, अहवालाची प्रतीक्षा संपणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 1:12 AM