CoronaVirus : अफवा पसरवू नका अन्यथा कारवाई, जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:13 AM2020-04-27T01:13:48+5:302020-04-27T01:13:58+5:30
सध्या विविध समाज माध्यमांवर कोरोनाबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलिबाग : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी आणि लॉकडाउनचे पाऊल उचललेले आहे. सध्या विविध समाज माध्यमांवर कोरोनाबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची गंभीर दखल रायगड जिल्हा पोलिसांनी घेतली आहे. खोट्या अफवा पसरवून समाज स्वास्थ बिघडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिला आहे. नागरिकांना कोणतीही तक्रार करायची असल्यास त्यांना १०० नंबरवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोना विषाणूसंदर्भात काही समाजकंटक व असामाजिक संघटनेकडून व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इंस्टाग्राम, टिकटॉक व इतर समाज माध्यमांद्वारे अक्षेपार्ह संदेश पोस्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा, अन्यथा अशा पोस्ट प्रसारित करणारे व्यक्ती व सोशल मीडियावरील त्या ग्रुपचे अॅडमीन, पोस्टवर अक्षेपार्ह प्रतिक्रि या नोंदविणारी व्यक्ती, अशा सर्वांवर भारतीय दंड विधान, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व इतर प्रचलित विविध कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
कोरोना या संसर्गातून होणाºया रोगाची कुणीही भीती बाळगू नका, काळजी हाच त्यावरील उपाय आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, सार्वजनिक कार्यक्रमात काही काळ सहभागी होणे टाळा, हस्तांदोलन टाळा, काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा आणि वेळोवेळी तोंडावर हात नेऊ नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्कचा वापर करा, घरातून बाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा, असे अवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी रायगडकरांना केले आहे.
>सायबर शाखेची करडी नजर
जिल्हा पोलीस सायबर शाखा सोशल मीडियावर नजर ठेवून आहे. कोणत्याही प्रकारचे आपत्तीजनक व दोन समाजात तेढ निर्माण करणारे संदेश, व्हिडीओ प्रसारित केल्याचे आढळून आल्यास हेल्पलाइन क्रमांक १०० या कमांकावर संपर्क साधावा, जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले आहे.