माथेरान : राज्य शासनाने पर्यटन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून, अटीशर्तींवर पर्यटन सुरू केले जाऊ शकते, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, ३३ टक्के च जागेचा वापर व्हावा व त्याचबरोबर इतर अटींमुळे मिळकत कमी व खर्चच जास्त अशी अवस्था माथेरानमधील व्यावसायिकांची होणार असल्याने पर्यटन सुरू होऊनही त्याचा काहीच फायदा छोट्या व्यावसायिकांना होणार नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे.राज्य शासनाने ८ जुलैपासून राज्यात पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा दिलासा मोठ्या शहरातील व्यावसायिकांना नक्कीच मिळणार आहे. मात्र, छोट्या पर्यटन क्षेत्रातील लोकांना मात्र त्याचा फटकाच बसणार आहे. ज्या नियम व अटी शासनाने व्यावसायिकांना घातल्या आहेत, त्या खूपच खर्चिक आहेत. माथेरानसारख्या पर्यटनस्थळी महिन्यातून फक्त वीकेंडलाच पर्यटन व्यवसाय मिळत असल्याने, हा सर्व खर्च करून व्यवसाय करणे म्हणजे पांढरा हत्तीच पाळण्यासारखा आहे.आधीच पर्यटन हंगाम हातचा निघून गेल्यामुळे कंबर खचलेल्या माथेरानकरांना एकीकडे कोरोनाशी दोन हात करावे लागत असताना, आता हा खर्च करून व्यवसाय सुरू करावा का? या चिंतेने ग्रासले आहे. एवढे करूनही एखादा कोरोनाग्रस्त पर्यटक येऊन येथे विषाणू सोडून गेल्यास, त्याचा फटकाही येथील स्थानिकांनाच बसणार आहे.हॉटेल व्यवसाय चार महिन्यांनंतर सुरू करणे किंवा नेमका पावसाच्या काळातच सुरू करणे म्हणजे एक दिव्यच आहे. आधीच परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात निघून गेल्यामुळे सर्वच हॉटेल व्यावसायिकांना कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार आहे व येथील आजूबाजूच्या आदिवासी वाडीतील लोकही शेतीची कामे सुरू झाल्यामुळे माथेरानकडे फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे शासनाच्या अटीशर्तींचे पालन करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना अडचणीचे ठरणार आहे. त्यातच प्रशासनाची कोणतीही मदत येथील व्यावसायिकांना मिळत नसल्याने, व्यवसाय सुरू होताच शासकीय कर, पाण्याची बिले, वीजबिले व शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार हॉटेल व्यवसाय सुरू आहे का? हे पाहण्यासाठी चार महिने गायब असलेला अधिकारी लगेच येणार आहे. त्यामुळेच माथेरानमधील लहान-मोठे उद्योजक हा निर्णय कसा घ्यावा, या चिंतेत आहेत.स्थानिकांत द्विधा परिस्थितीहॉटेल व्यवसाय नेमका पावसाच्या काळातच सुरू करणे म्हणजे एक दिव्यच आहे. व्यवसाय सुरू केल्यास थोडे-फार कमाईचे साधन सुरू होणार व पर्यटक आले, तर कोरोनाच्या प्रसाराचे संकट, त्यामुळे येथील स्थानिकांच्या मनात निर्णयामुळे द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे.
coronavirus: शासनाच्या अटींमुळे मिळकतीपेक्षा खर्चच दुप्पट, माथेरानमधील व्यावसायिक चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 12:41 AM