CoronaVirus : रायगड जिल्ह्यातील आठ तालुके ठणठणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 12:30 AM2020-04-26T00:30:10+5:302020-04-26T00:30:22+5:30
जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळीच उपाययोजना केल्यामुळेच हे जसे शक्य झाले आहे, तसेच वेळोवेळी केलेल्या सूचनांचे स्थानिकांनी पालन केल्यानेच सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
अलिबाग : कोरोनाचा शिरकाव हा मोठ्या संख्येने शहरीभागांमध्ये झाला आहे, तर ग्रामीण भागाला कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, तर उर्वरित पाच तालुक्यांत कोरोनाचा प्रकोप दिसून येतो. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळीच उपाययोजना केल्यामुळेच हे जसे शक्य झाले आहे, तसेच वेळोवेळी केलेल्या सूचनांचे स्थानिकांनी पालन केल्यानेच सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. मात्र, अलिबागमध्ये चार पोलिसांना होम क्वॉरंटाइन केल्याने अलिबागकरांच्या मनात धडकी भरली आहे.
लॉकडाउन करण्यात आलेल्या घटनेला एक महिना उलटून गेला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन खंबीरपणे उभे राहिले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नागरिकांनीही त्यांना साथ दिली आहे. त्यांच्या एकत्रित परिणामामुळे अलिबाग, पेण, खालापूर, रोहो, मुरुड, पाली, माणगाव, म्हसळा या तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ शकलेला नाही. तर पनवेल, उरण, कर्जत, श्रीवर्धन आणि पोलादपूर या पाच तालुक्यांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा पनवेल महापालिका आणि पनवेल ग्रामीण क्षेत्राला बसला असल्याचे दिसून येते. या विभागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. २४ एप्रिलपर्यंत ६२ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये ४४, पनवेल ग्रामीणमध्ये-८, श्रीवर्धन-५, उरण-४, पोलादपूर-२ आणि कर्जत-१ असा समावेश आहे. दोघांना मृत्यूने कवटाळले आहे. तर १९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ४३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
रायगड जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. बाहेरून येणाऱ्या वाहनांचेही निर्जंतुकीकरण करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत आहे. बाहेरून येणाºया नागरिकांची माहिती तातडीने प्रशासनाला कळवण्याचे आवाहन करण्यात आल्याने नागरिक चांगलेच सर्तक झालेले आहेत. त्यामुळे पोलीस, जिल्हा प्रशासनातील नियंत्रण कक्षातील फोन सातत्याने खणखणत आहेत. आतापर्यंत तब्बल अडीच हजारांहून अधिक नागरिकांना होम क्वॉरंटाइन केले आहे. त्यांच्याकडे असणाºया मोबाइल जीपीएसच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. होम क्वॉरंटाइन केलेल्यांपैकी कोणी घराबाहेर पडल्याचे नियंत्रण कक्षाला कळताच तातडीने संबंधिताला चेतावनी देणारा फोन जात आहे. त्यामुळे आपल्यावर नजर ठेवली
जात असल्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर बºयापैकी चाप लागल्याचे दिसून येत आहे.
>श्रीवर्धनमध्ये पाच जणांना लागण
अलिबाग, पेण, खालापूर, रोहो, मुरुड, पाली, माणगाव, म्हसळा या तालुक्यांमध्ये अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. श्रीवर्धनमधील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने सर्वच प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली. रायगड पोलिसांनी संबंधित वाहनचालकाचा शोध घेतला आणि त्याला मुंबईतून ताब्यात घेतले होते. यातील गंभीर बाब म्हणजे हा वाहनचालकच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने रायगड पोलीसदल चांगलेच हादरून गेले आहे. संबंधित वाहनचालकाला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या इमारतीमधील एका खोलीत ठेवण्यात आले होते.
>चालकाला पकडणारे क्वॉरंटाइन
वाहनचालकाला पकडणारे दोन पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचारी यांना होम क्वॉरंटाइन करावे लागले आहे. संबंधित पोलीस कोणाच्या संपर्कात आले होते का, याकडेही गंभीरतेने पाहणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलिबाग कोरोनापासून मुक्त होता. मात्र, पोलीस आता क्वॉरंटाइन झाल्याने शहरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.