Coronavirus : कर्जतमध्ये पाच परदेशी नागरिक निगराणी कक्षात, कोरोना नसल्याचा तहसील कार्यालयाचा निर्वाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:15 AM2020-03-17T02:15:21+5:302020-03-17T02:15:43+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, रायगड जिल्हा प्रशासनाने गंभीर आणि खबरदारीची पावले उचलली आहेत.
कर्जत : बाहेरच्या देशातून आलेल्या परदेशी पाच नागरिकांना कर्जत येथील निगराणी कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती कर्जत प्रशासनातर्फे देण्यात आली.
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, रायगड जिल्हा प्रशासनाने गंभीर आणि खबरदारीची पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने खबरदारी जिल्हा, तालुका पातळीवर घेण्यात येत आहे. कर्जत तालुक्यात बाहेरच्या देशातून दुबईतून २, मलेशिया २, इंग्लंड १ असे पाच नागरिक आले आहेत. खबरदारी म्हणून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या निगराणी कक्षात त्यांना ठेवण्यात आले आहे.
त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, मात्र ते परदेशातून आले आहेत म्हणून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून १४ दिवस डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात येणार आहे. त्यांना कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचा निर्वाळा कर्जत तहसील प्रशासनाने दिला असून फक्त बाहेरच्या देशातून आले आहेत म्हणून त्यांना निगराणीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नाही असे देखिल स्पष्ट के ले आहे.
११ ठिकाणी कोरोना संक्रमण उपाययोजना तालुका नियंत्रण कक्ष
आरोग्य विभाग पंचायत समिती कर्जत कोरोना संक्रमण उपाययोजना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय कोरोना संक्रमण उपाययोजना तालुका नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत, यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सी.के. मोरे काम पाहत आहेत.
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल, नेरळ येथील सन्मान लॉज, वामनराव पै रामवाडी येथील जीवनविद्या मिशन, कळंबोली येथील रिवर गेट रिसॉर्ट, खांडपे येथील रेडिसन ब्ल्यू, वांजळे येथील डॉक्टर मोदी रिसॉर्ट, कळंब येथील दी रिच रिसॉर्ट, वारे कुरुंग रोड येथील फार्म लाइफ, मागार्ची वाडी येथील भीमाशंकर हिल आणि कोंठीबे येथील हरी ओम मठ अशा ११ ठिकाणी कोरोना संक्रमण उपाययोजना तालुका नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.
उरणमधील रुग्णालयात ४० खाटांची व्यवस्था
उरण : राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा सामना आणि निवारण करण्यासाठी उरण तालुक्यात युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी ४० खाटांच्या खासगी रुग्णालयाचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशभरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळून आली आहे. राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी कंबर कसली आहे. संसर्गजन्य कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाला सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील बोकडवीरा येथील खासगी केअर पॉइंट रुग्णालयाचे अधिग्रहण करण्यात आले असून ४० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जेएनपीटीच्या
ट्रॉमा सेंटरमध्येही आपत्कालीन
म्हणून आणखी आठ खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
परदेश दौऱ्यावरून परतलेल्या दहा व्यक्तींना खारघरमधील विलगीकरण केंद्रात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
परिसरातील परीक्षा सुरू असलेल्या शाळा, महाविद्यालये वगळता इतर सर्व बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उरण परिसरात १५ ते ३१ मार्च दरम्यान होणाºया मोर्चे, जाहीर सभांच्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा सामना आणि निवारणासाठी उरण तालुक्यात युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे.
- भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण