अलिबाग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोयनाड पोलिसांनी बुधवारी सायंकाळी काचरी-पिटकरी गावातून सोशल डिस्टन्सिंग ठेवत संचलन केले. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. पोलिसांच्या कामगिरीबद्दल काचरी गावातील नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला आहे.कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी बुधवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोयनाड विभागातील काचरी, पिटकरी भागात पोयनाड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास अव्हाड, पोलीस कर्मचारी संचलनामध्ये सहभागी झाले होते. पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस संचलन करण्यात आले. नागरिकांनी घराबाहेर पडू नका, भाजी, किराणा खरेदीसाठी वाहनांचा वापर न करता पायी चालत जाऊन जवळपास खरेदी करा, क्वारंटाइन व्यक्तींनी घरात थांबा, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.बुधवारी संध्याकाळी पोयनाड पोलीस स्टेशनच्या वतीने काचरी येथे संचलन आयोजित केले होते. त्या वेळी काचरी ग्रामस्थांनी पोलिसांवर पुष्पवृष्टी करून कृतज्ञता व्यक्त केली. पोलिसांबद्दल आदर व्यक्त करून त्यांच्या कामाचे आगळ्यावेगळ्या प्रकारे कौतुक करत प्रोत्साहन दिले. पोयनाडमध्ये संचलनासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक महादेव जाधव आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
CoronaVirus: काचरी गावात पोलिसांवर फुलांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 1:15 AM