coronavirus: गिरीस्थान नगरपरिषदेची निवडणूक, माथेरानमध्ये राजकीय वातावरण पेटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:04 AM2020-07-11T01:04:15+5:302020-07-11T01:04:51+5:30

उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवकांवर राजीनाम्यासाठी वाढता दबाव

coronavirus: Giristhan Municipal Council Election: Political atmosphere ignited in Matheran | coronavirus: गिरीस्थान नगरपरिषदेची निवडणूक, माथेरानमध्ये राजकीय वातावरण पेटले

coronavirus: गिरीस्थान नगरपरिषदेची निवडणूक, माथेरानमध्ये राजकीय वातावरण पेटले

Next

- मुकूंद रांजणे
माथेरान : गिरीस्थान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २०१६ मध्ये झाली. त्यावेळी सत्तांतर होऊन शिवसेनेची स्वबळावर सत्ता आली. त्यांमध्ये नगराध्यक्ष पाच वर्षांसाठी थेट पद्धतीने निवडून आल्या. मात्र, त्यानंतर उपनगराध्यक्षपद आणि दोन स्वीकृत नगरसेवक विराजमान झाले. त्यांची मुदत अडीच वर्षे ठरली होती. मात्र, अद्याप उपनगराध्यक्ष व एक महिला स्वीकृत नगरसेविकेने राजीनामा न दिल्याने पुढील शब्द दिलेल्यांना पदे देता येत नाहीत, म्हणून संबंधितांनी राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढत असल्याने राजकीय वातावरण पेटले आहे.

माथेरान नगरपरिषदेत २०१६ मध्ये शिवसेनेची स्वबळावर एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी एकूण १४ सदस्य निवडून आले होते, तर शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना अडीच वर्षांसाठी स्वीकृत सदस्य पद दिले होते. २०१६च्या त्या निवडणुकीवेळी शेतकरी कामगार पक्षासह, आरपीआयने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि आरपीआयच्या प्रमुखांना पुढील काळात अडीच वर्षे स्वीकृत सदस्य पद देण्याबाबत आश्वासन दिले होते. सुरुवातीच्या काळात या पदावर चंद्रकांत जाधव आणि ऋतुजा प्रधान यांची अडीच वर्षासाठी नियुक्ती केली होती, तर उप नगराध्यक्षपद आकाश चौधरी यांना दिले होते. हे पद अडीच वर्षांसाठी देण्याचे ठरले होते, परंतु पक्षातील अंतर्गत मतभेद आणि सुरुवातीपासून जुन्या-नव्याचा वाद धुमसत होता. त्यामुळे अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला, तरी स्वीकृत आणि उपनगराध्यक्ष या पदांचा संबंधित पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा देण्यात आला नव्हता.

त्यानंतर, पक्ष कार्यकारिणीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. वाद चव्हाट्यावर येऊ नये, यासाठी पक्षाच्या वरिष्ठांसोबत
१ जुलै रोजी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी बैठक झालू होती. त्यावेळेस स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव यांनी पदाचा राजीनामा वरिष्ठांना सुपुर्द केला होता.

दुस-या स्वीकृत सदस्या ऋतुजा प्रधान आणि उप नगराध्यक्ष आकाश चौधरी यांचे राजीनामे सादर होणे अपेक्षित होते. अडीच वर्षानंतर सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे शफीक शेख यांना स्वीकृत सदस्य पद देण्याबाबत ठरल्याचे समजते, तर उप नगराध्यक्ष पदासाठीही अनेक जण इच्छुक दिसत आहेत, परंतु राजीनामा दिल्याशिवाय त्या पदांवर कुणाकुणाची वर्णी लागणार आहे? हे गुलदस्त्यात आहे.

‘२०१६च्या निवडणुकीच्या वेळी आम्ही शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यावेळी शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी सत्ता स्थापन झाल्यावर पुढची अडीच वर्षे स्वीकृत सदस्य म्हणून माझी नियुक्ती करणार, असे आश्वासन दिले होते. स्वीकृत सदस्य चंद्रकांत जाधव यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे या रिक्त जागेवर मला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हे पद मला देणे क्रमप्राप्त आहे.’ - शफीक शेख,

‘शिवसेना पक्षात शब्दाला फार मोठे महत्त्व आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पद व दोन स्वीकृत सदस्य पदांच्या निवडीच्या प्रक्रियेला थोडा विलंब झाला असला, तरी १ जुलै रोजी कर्जत तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या आदेशानुसार, स्वेच्छेने मी माझ्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्याकडे सादर केलेला आहे. बैठक होऊन दहा दिवस उलटूनही या निवडीच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. अपेक्षा करतो की, बाकी सदस्यांनीही लवकरात लवकर आपले राजीनामे सादर करावेत, जेणेकरून सर्वांना संधी मिळेल . - चंद्रकांत जाधव, माजी स्वीकृत सदस्य,माथेरान

'सर्व पदाधिकारी नगरसेवक, शहर प्रमुख यांची कर्जत येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्यावेळी माथेरान शिवसेनेच्या अंतर्गत वादावर अखेर पडदा पडला व दोन गटांतील वाद मिटला. त्यानंतर, आमदार व जिल्हा प्रमुख यांनी आम्ही दिलेला शब्द तुम्हाला मानलाच पाहिजे, असे खडे बोल सुनावले व आम्हाला अडीच वर्षाकरिता देऊ केलेले उपनगराध्यक्ष हे पद प्रतिभा घावरे यांनाच सर्वांसमोर देऊ केले आहे. दिलेला शब्द उशिरा का होईना, पण आम्हाला लवकरच न्याय मिळणार आहे.' - प्रदीप घावरे, माजी नगरसेवक माथेरान

Web Title: coronavirus: Giristhan Municipal Council Election: Political atmosphere ignited in Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.