बिरवाडी : महाड तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत सवाणे हद्दीतील शेलटोळी या कोरोनाबाधित क्षेत्रातील १८ कुटुंबांतील ६८ लोकसंख्येला ग्रामपंचायतीतर्फे मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी प्रभाकर सागवेकर यांनी दिली आहे.
शेलटोळी येथील २० वर्षीय तरुणाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाबाधित क्षेत्र तसेच बफर झोन जाहीर करण्यात आल्यानंतर महाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाज बिराजदार, महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जोशी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी, सहायक गटविकास अधिकारी सुनील यमगर, ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश बोबडे, उपसरपंच अनिल जाधव, विस्तार अधिकारी डी. के. वाघमोडे, आरोग्य सेविका के. एस.शेजवळ व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पथकाने कोरोनाबाधित क्षेत्राची पाहणी केली. या ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.
तसेच या ग्रामपंचायतींमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबांमधील व्यक्तींची कोरोना चाचणीसाठी येणारा खर्च महाड एमआयडीसीमधील एमबॉए प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत करण्यात येणार असून कोरोनाबाधित क्षेत्रातील ६३७ नागरिकांचे सर्वेक्षण आरोग्य विभागामार्फत करण्यात आले असून त्या नागरिकांच्या शरीराचे तापमान यांना सर्दी, खोकला तापाची बाधा आहे का, याची माहिती संकलित करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.लॉकडाउनच्या काळात माणुसकीचे दर्शनमहाड तालुक्यातील शेलटोळी येथील २० वर्षीय परप्रांतीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न ३० एप्रिल रोजी केला होता. मात्र, या तरुणाला तत्काळ वैद्यकीय व आर्थिक मदत उपलब्ध करून देत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल उतेकर यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. मुंबई येथील रुग्णालयात या पीडित तरुणावर उपचार सुरू आहेत. या तरुणाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरदेखील त्याच्या कुटुंबीयांना मदतीचा ओघ सुरू ठेवत उतेकर यांनी माणुसकी जोपासली आहे.