रूग्णवाहिकेमुळे वाचले आजीबाईंचे प्राण; सामाजिक संस्थेची मदतीनं वेळीच उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 01:04 AM2020-05-03T01:04:37+5:302020-05-03T01:04:52+5:30
लॉकडाउनच्या काळात शेलू येथील सुनंदा अनंत शेलार या ७० वर्षीय आजीला तीन ते चार दिवस सतत ताप येत होता; परंंतु घरी उपचार होत नव्हते.
कांता हाबळे
नेरळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाउनच्या काळात अनेक ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत, तर काही ठिकाणी रुग्वाहिका नाहीत. अशा परिस्थितीत शेलू येथील भोले बाळाजी फाउंडेशनची रुग्णवाहिका २४ तास सेवेत रुजू आहे. या रुग्णवाहिकेमुळेच शेलू येथील एका ७० वर्षीय आजीला वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहे.
तालुक्यातील भोले बालाजी फांउडेशने लॉकडॉउनच्या काळात अनेक गोरगरीब जनतेला आधार देण्याचे काम केले आहे. भोले बालाजी फांउडेशनचे अध्यक्ष नीलेश कोळेकर यांच्या माध्यमातून जीवनाश्यक वस्तूंचे वाटपदेखील करण्यात आले आहे. तसेच त्यांची रुग्णवाहिका ही गेल्या चार वर्षांपासून गोरगरिबांच्या सेवेसाठी उभी आहे.
लॉकडाउनच्या काळात शेलू येथील सुनंदा अनंत शेलार या ७० वर्षीय आजीला तीन ते चार दिवस सतत ताप येत होता; परंंतु घरी उपचार होत नव्हते. भोले बालाजी फाउंडेशने आणि रुग्णवाहिकेचे वाहक मनोहर कदम यांनी तत्काळ नेरळ येथे उपचारासाठी नेले.
तेथील डॉक्टरने आजीला जास्त ताप असल्याने कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर आजीला कर्जत येथे नेल्यानंतर योग्य उपचार करण्यात आले.
वेळेत उपचार मिळाल्याने आजीचे प्राण वाचले आहेत. अशा लॉकडाउनच्या काळात सुमारे ८० रुग्णांच्या सेवेसाठी ही रुग्णवाहिका धावून आली आणि त्यांना वेळेत उपचार मिळून देण्याचे काम भोले बालाजी परिवाराने केले आहे. त्यामुळे असे विनामूल्य सेवा देणाऱ्या भोले बाळाजी फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.