Coronavirus: विवाहसोहळ्याचा खर्च वाचवून गरजूंना मदत; समाजासमोर घरत कुटुंबाने ठेवला आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 01:57 AM2020-05-08T01:57:35+5:302020-05-08T01:57:43+5:30
वधूवरांच्या हस्ते कपडे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
राकेश खराडे
मोहोपाडा : कोरोना (कोविड १९) या विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देश भीतीच्या छायेत आहे. लॉकडाउनमुळे रोजंदारीवर पोट भरणाऱ्या गरजू गोरगरिबांची अवस्था बिकट झाली असून दोरी तुटलेल्या पतंगासारखी होऊन बसली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर विवाहसोहळ्यावरही बंधन आल्याने गर्दी न करता ठरावीक नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. रसायनीनजीकच्या कसलखंड येथील धनवंती घरत आणि रोहिदास जुनघरे यांचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने गर्दी न करता सोशल डिस्टिक्शनचे पालन करून करण्यात आला. या वेळी गरजू आदिवासी कु टुंबाला महिनाभर पुरेल एवढे राशन वाटप करण्यात आले.
हा विवाहसोहळा भटजी विकास जोशी यांच्या मंगलाष्टकांनी पार पडला. वधूवरांच्या हस्ते आसपासच्या परिसरातील आदिवासी गोरगरीब बांधवांना कपडे शर्ट-पॅण्ट व महिनाभर पुरेल इतक्या धान्यासह किराणा सामान वाटप करण्यात आले. लग्नाला होणारा अनाठायी खर्च न करता तो गोरगरिबांना मदतीसाठी खर्च करा, त्यांचे आशीर्वाद मिळतील, असे वर रोहिदास जुनघरे व वधू धनवंती घरत यांनी सांगितले. लॉकडाउन काळात विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन वधूवरांनी केले. यापुढे विवाहसोहळे थाटामाटात न करता अनाठायी खर्च करू नये, अशी मागणी या वधूवरांनी करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. या वेळी सरपंच माधुरी पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच रोहित घरत, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील आदी उपस्थित होते.