वैभव गायकर
पनवेल :पनवेल मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होताना दिसुन येत आहे.प्रशासनामार्फत याकरिता शक्यते प्रयत्न केले जात आहेत.विशेष म्हणजे खबरदारी म्हणुन होम कोरंटाईन केलेल्या नागरिकांचा 14 दिवसाचा कार्यकाळ वाढवुन 28 दिवसापर्यंत करण्याचा निर्णय पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला आहे.मात्र होम कोरंटाईन केलेले नागरिक लहान सहान गोष्टीसाठी बाहेर पडत असल्याचे निष्पन्न झाले आहे.यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढत चालली आहे.
पनवेल मध्ये कोविड 19 विषाणूचा संसर्ग झालेले नागरिकांची संख्या 23 झाली आहे.एका रुग्णाचा यामध्ये मृत्यू झाला आहे.अद्यापही अनेकांचे नमुने प्रतीक्षेत आहेत.सध्याच्या घडीला होम कोरंटाईन केलेल्या नागरिकांची संख्या तब्बल 1700 झाली आहे.अशा अवस्थेत प्रत्येक नागरिकावर लक्ष ठेवणे पालिकेला शक्य होणार नाही.पालिकेने या नागरिकांच्या संपर्कात राहण्याच्या दृष्टीने कोव्हिलेअर नामक अप्लिकेशन देखील विकसित केले आहे.मात्र कोरंटाईन केलेले नागरिक पालिकेच्या अवाहनाला योग्य तो प्रतिसाद देत नसल्याने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमूख हे अशा नागरिकांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.खारघर शहरातील एका नागरिकाला 15 व्या दिवशी कोविड 19 टेस्ट पॉसिटीव्ह आली तर आणखी एका नागरिकाची 22 व्या दिवशी कोविड 19 टेस्ट पॉसिटीव्ह आल्याचे निष्पन्न झाले.या दोन्ही रुग्ण होम कोरंटाईन असताना घरा बाहेर पडले.यामुळे समाजात संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होत आहे.तरी देखील वारंवार अशाप्रकारे नागरिक होम कोरंटाईनचे नियम पायदळी तुडवत आहेत.अशा नागरिकांवर आयुक्त देशमुख हे गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी संख्या अत्यल्प आहे.पालिकेच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे सुमारे 2000 कर्मचाऱ्यांचे काम सध्याच्या घडीला केवळ 600 कर्मचारी,अधिकारी वर्गावर येऊन ठेपल्याने पालिका प्रशासनावर कामाचे प्रचंड ताण वाढले आहे.यामध्ये तुटपुंज्या मानधनावर काम करणारे पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.अशा परिस्थितीत नागरिकांनी पालिका प्रशासनाला करणे गरजेचे असताना देखील नागरिक पालिकेला सहकार्य करताना दिसत नाहीत.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टस्टिंगचा मोठ्या प्रमाणात उल्लंघन देखील नागरिक करताना दिसून येत आहेत.पनवेल मधील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होणार नाही यादृष्टीने प्रांत अधीकारी दत्तात्रेय नवले,तहसिलदार अमित सानप हे देखील संपूर्ण महसुल प्रशासनाच्या सहाय्याने पालिका प्रशासनासोबत काम करीत आहेत.
कोरंटाईन केलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक नेमण्याची मागणी
पनवेलमध्ये जस जसे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.तस तसे या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना होम कोरंटाईन केले जात आहे.अशा परिस्थितीत दिवसेंदिवस कोरंटाईन केलेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे.या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांच्या मदतीने विशेष पथक स्थापन करण्याची मागणी प्राध्यापक डॉ जी के डोंगरगावकर यांनी केली आहे.कोरंटाईन केलेल्या नागरिक नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केल्यास या नागरिकांमध्ये भीती राहील अन्यथा संबंधित नागरिक स्वतः सह दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकतच राहतील.
संपूर्ण पालिकाप्रशासन या आणीबाणीच्या परीस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे.अशावेळी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.होम कोरंटाईनचा कार्यकाळ 14 दिवसांवरून 28 दिवसापर्यंत केला आहे.अशा नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडु नये.होम कोरंटाईन न पाळणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल केले जातील. -गणेश देशमुख, आयुक्त,पनवेल महानगरपालिका
पनवेलमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण 23
खारघर 6
कळंबोली 11
पनवेल 1
कामोठे 3
तळोजे 1