CoronaVirus: माथेरानमधील हातरिक्षा चालकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 01:17 AM2020-04-24T01:17:38+5:302020-04-24T01:17:41+5:30

शासनाच्या मदतीची प्रतीक्षा; पर्यटन बंद असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

CoronaVirus: Hunger of handcart drivers in Matheran | CoronaVirus: माथेरानमधील हातरिक्षा चालकांची उपासमार

CoronaVirus: माथेरानमधील हातरिक्षा चालकांची उपासमार

Next

माथेरान : कोरोनामुळे राज्यात सर्वत्र व्यवहार बंद करण्यात आल्यामुळे माथेरानमध्येसुद्धा १८ मार्चपासून पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. एका महिन्यापासून कोरोनाच्या जागतिक संकटामुळे येथे स्मशानशांतता पसरली आहे. हातावर पोट भरण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या या गरीब श्रमिकांच्या भावनेकडे अद्याप येथील लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित केले आहे, ना शासनाने काही मदत दिली आहे. त्यामुळे येथील हातरिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

मोटार वाहनांना बंदी असल्याने केवळ पर्यटन, शेतीवर येथील जीवनमान अवलंबून आहे. त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्यांपासून ते मोठ्या हॉटेल व्यावसायिक या सर्वांचा संसाराचा गाडा पर्यटनावर आधारित आहे. माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून हातरिक्षा हेच वाहतुकीचे मुख्य साधन. अर्थातच वयोवृद्ध ज्येष्ठ पर्यटकांना याच वाहनांची नितांत आवश्यकता असते. त्या वेळेस येथील हातरिक्षा चालक स्वत: ही अतिकष्टदायक कामे करत आपल्या रक्ताचे पाणी करून पर्यटकांना बाराही महिने सेवा उपलब्ध करून देत असतात. ही कामे करण्यासाठी स्थानिकांसह नांदेड, यवतमाळ, अकोला येथून श्रमिक आलेले आहेत. अनेक वर्षे हे श्रमिक पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देत आहेत. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार पूर्णत: बंद करण्यात आल्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह करणे म्हणजे मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे राहिले आहे. त्यातच येथील राजकीय मंडळींनी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी सातत्याने केवळ घोड्यांच्या खाद्यासाठी पुढाकार घेतला आहे तर माथेरानप्रेमी मुंबइतील दानशूर व्यक्तींकडून घोड्यांना खाद्य पुरविले जात आहे; परंतु हातरिक्षा चालकांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. यामुळे हातरिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शाासनाने तरी लक्ष द्यावे, अशी मागणी या श्रमिकांकडून होत आहे.

सायकल रिक्षाचालकांना त्या त्या राज्यांमधील सरकार अशा आणीबाणीच्या काळात आर्थिक मदत करीत आहे. आपल्या रक्ताचे पाणी करीत माथेरानच्या पर्यटनस्थळावर हातरिक्षा चालवणाºया चालक व मालकांनादेखील आर्थिक मदत शासनाने द्यावी.
- सुनील शिंदे, सचिव, श्रमिक रिक्षा संघटना

Web Title: CoronaVirus: Hunger of handcart drivers in Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.