Coronavirus: कर्जत आजपासून तीन दिवस बंद; व्यापारी फेडरेशनच्या बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 01:38 AM2020-06-29T01:38:05+5:302020-06-29T01:38:13+5:30
यापूर्वी बंद पाळताना जीवनावश्यक सेवा म्हणजे किराणा दुकान, दूध डेअरी, भाजीपाला, औषधांची दुकाने, दवाखाने सुरू असायचे मात्र या बंदच्या वेळी केवळ वैद्यकीय सुविधा म्हणजे औषधांची दुकाने व दवाखानेच सुरू राहतील
कर्जत : तालुक्यात कोरोनाचा ससेमीरा सुरू आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. यापार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापाऱ्यांनी सोमवारपासून तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमधून फक्त वैद्यकीय सुविधांना वगळण्यात आली आहे.
तालुक्यात सुरुवातीला कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, मात्र काही दिवसांनी कोरोनाने तालुक्यात शिरकाव केला आणि हळूहळू त्याने आपला पसारा वाढवला. लॉकडाऊन काढण्यात आल्यानंतर कर्जत शहरा बरोबरच तालुक्यात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. शहरा लगतच्या गावांमध्ये सुद्धा लक्षणीय रुग्ण आढळत आहेत. अल्पावधीतच शतक पार करून कोरोनाची वेगाने वाटचाल सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी रविवारी कर्जतच्या व्यापारी फेडरेशनने तातडीची सभा बोलवली. यावेळी सोमवारपासून तीन दिवस कर्जत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी बंद पाळताना जीवनावश्यक सेवा म्हणजे किराणा दुकान, दूध डेअरी, भाजीपाला, औषधांची दुकाने, दवाखाने सुरू असायचे मात्र या बंदच्या वेळी केवळ वैद्यकीय सुविधा म्हणजे औषधांची दुकाने व दवाखानेच सुरू राहतील असे ठरविण्यात आले. या वेळी
व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष मयूर जोशी, सचिव राजेश ओसवाल, सुमेश शेट्ये, मोहन ओसवाल, रणजित जैन, मदन परमार, महेंद्र बोडके, विक्रम ओसवाल, मंगल परमार, रामकिशोर गुप्ता, आशिष शहा, अनुप मावळे, शेखर बोराडे, किरण ओसवाल आदी प्रमुख व्यापारी उपस्थित होते.