coronavirus: मुलांना जेवायला मिळेल, मात्र गुरांच्या चारा-पाण्यासाठी मला डिस्चार्ज द्या! काेविड रुग्णांची सुट्टीसाठी कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 12:45 AM2020-10-29T00:45:36+5:302020-10-29T00:45:49+5:30
Raigad coronavirus: रायगड जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना या कालावधीत अनेक चांगल्या-वाईट गाेष्टींचा अनुभव आला.
- आविष्कार देसाई
रायगड : ''माझ्या मुलांना शेजारचे जेवायला देतील. मात्र, माझ्या गुरा-ढाेरांना चारा काेण देईल, आता मला रुग्णालायतून लवकरच सुट्टी द्या” अशी विनंती रुग्णालयात उपाचार घेणाऱ्या एका महिला रुग्णाने केल्याचे समारे आले आहे. रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी मिळावी, यासाठी विविध कारणे दिली जात आहेत. त्यामुळे डाॅक्टरही चक्रावून गेले आहेत.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना या कालावधीत अनेक चांगल्या-वाईट गाेष्टींचा अनुभव आला. रुग्णालयातून सुट्टी मिळावी, यासाठी काही रुग्ण विविध कारणे सांगून डाॅक्टरांसह नर्स यांचा चांगलाच पिच्छा पुरवच आहेत. रुग्णालयातून सुट्टी मिळावी, यासाठी देण्यात येणारी कारणे ऐकून डाॅक्टरही चक्रावून गेले आहेत. मात्र, पूर्ण उपचारानंतरच रुग्णांना सुट्टी दिली जात आहे.
डिस्चार्जसाठी काेणती कारणे सांगितली जातात?
- माझा मुलगा खासगी कंपनीमध्ये नाेकरी करताे. माझ्यामुळे त्याला दिवस-रात्र रुग्णालयाबाहेर थांबावे लागत आहे. मला सुट्टी देत नाही, तोपर्यंत माझा मुलगाही येथून जाणार नाही, त्याच्या नोकरीचा प्रश्न आहे.
- माझा मुलगा लहान आहे, मला घरी जाणे आवश्यक आहे, माझ्या नवऱ्याला नीट लक्ष देता येणार नाही. घरी खूप आडचण होईल, मला सोडले
नाही, तर मी रुग्णालयातून पळून जाईल.
- मला बाहेर इतर ठिकाणी झोपच लागत नाही, दुसऱ्या ठिकाणी कधी राहिलेच नाही, नवीन ठिकाणी मला भीती वाटते, मला लवकर डिस्चार्ज करा.
- मला सुट्टी दिली नाही, तर मी शेजारच्या बेडवर झोपेन, असा हट्टही एका रुग्णाने धरला. डाॅक्टरांनी त्याचे बाेलणे मनावर घेतले नाही. मात्र, ताे रुग्ण जाणून-बुजून शेजारच्या बेडवर जाऊन झाेपत हाेता. त्यामुळे नाकीनऊ आले हाेते.
- माझ्या मुलांना शेजारी जेवायला देतील, त्यांना काय हवे नकाे ते सर्व देतील, परंतु माझ्या गुरा-ढाेरांना चारा-पाणी काेण देईल, मला सुट्टी दिली नाही, तर गुरा-ढाेरांचे हाल हाेतील.
सात दिवस उपचार करून नंतर साेडले जाते घरी
सध्या जिल्ह्यात काेराेनाचा प्रभाव कमी हाेत आहे. त्याचप्रमाणे, रुग्णांना काेराेनाचा संसर्ग हा कमी प्रमाणात असल्याने त्यांच्यावर याेग्य उपचार करून त्यांना किमान सात दिवसांनी सुट्टी देण्यात येत आहे. अगदीच संसर्गाचे प्रमाण अधिक असल्यास त्यांना सुट्टी देण्यास उशीर हाेतो. मात्र, सुट्टी मिळाल्यानतंरही रुग्णांनी वेळेवर औषधे घेऊन जास्तीतजास्त आराम करायचा आहे. याबरोबर योग्य आहार घ्यायचा आहे.
रुग्णालयातून सुट्टी मिळावी, यासाठी रुग्णांकडे विविध कारणे तयार असायचीच. त्यामध्ये काही मजेशीर असायची, तर काही रुग्ण समस्या सांगून सुट्टी मागत हाेते. काेराेना हा संसर्ग परसवणारा आजार असल्याने रुग्ण बरा हाेत नाही, ताेपर्यंत त्याला डिस्चार्ज देण्यात आला नाही.
- डाॅ. सुहास माने,
जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड